ठाणे- ठाणे परिसरात कोरोनाचा फास आवळत चालला आहे सातत्याने रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. ठाण्यात कोरोनाचा गुणाकार झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर आतापर्यंत ठाणे पोलीस दलातील 10 पोलीस कर्मचारी आणि 4 अधिकारी यांना फटका बसला आहे. तर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या घरापर्यंत थेट कोरोना पोहचल्याने तब्बल 72 जणांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. मागेही पाच दिवसापासून 10 , 15, 17 आणि गुरुवारी तब्बल 31 रुग्ण आढळल्याची आकडेवारी पालिका प्रशासनाने दिलेली आहे. ही आकडेवारी पाहता ठाण्यात कोरोनाचे गंभीर अवस्था असून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी पालिका प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची गर्दी, बाजारात भाजीपाला घेण्यासाठी होणारी गर्दी, रस्त्यावर मोकाट कामाशिवाय फिरणारे टवाळखोर आदींच्या बंदोबस्तासाठी कार्यरत ठाण्यातील 14 पोलीस कर्मचारी याना कोरोनाचे लागण झालेली धक्कादायक माहिती खुद्द पोलीस सूत्रांनी दिली आहे. यात चार अधिकारी यांचा समावेश असून त्यांच्यावर आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांवर उपचार सुरू आहेत.
पोलिसांना कोरोनाची लागण होण्याची सुरुवात मुंब्रा पासून सुरुवात झाली. दोन पोलीस अधिकारी यांच्यासह अनेकांना लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अवघे पोलीस ठाणेच क्वारंटाइन करण्यात आले. त्यानंतर वर्तकनगर आणि ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. खबरदारीचा उपाय म्हणून तब्बल 72 जणांना क्वारंटाइन करण्यात आले. क्वारंटाइन लोकांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत.
पोलिसांवरील कोरोनाचा धोका लक्षात घेता आता मुंबईनंतर ठाण्यातही सॅनिटायझिंग व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. बंदोबस्त, नाकाबंदी तसेच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ठिकठिकाणी ही व्हॅन फिरणार असून निर्जंतुकीकरणाचे काम करणार आहे. याशिवाय पोलिसांच्या सुरक्षेसाठी त्यांना पुरेशा प्रमाणात मास्क, हॅण्ड ग्लोज, पीपी किट,फेस शिल्डही पुरवण्यात आली आहेत. तसेच पोलीस वसाहतींमध्येही मोठया प्रमाणात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली असल्याची माहिती डीसीपी बाळासाहेब पाटील यांनी दिली.
मुंब्रा आणि वर्तकनगरला कोरोनाचा विळखा