ठाणे- निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांचे इनकमिंग जोरात सुरू असताना आता पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रवेशाचीही त्यात भर पडली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या सेना प्रवेशानंतर कल्याणमधील 'दबंग' पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले जगदीश लोहळकर यांनीही राजकारणात 'एंट्री' घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सत्ताधारी पक्षात न जाता राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.
हेही वाचा - मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणारे निवृत्त पोलीस अधिकारी जगदीश लोहाळकर यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी कल्याणचे माजी आमदार प्रकाश भोईर, प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, मनविसेचे विनोद केणे आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत असताना जगदीश लोहाळकर यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने गाजली. कल्याण पूर्वेतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालताना त्यांनी स्वत: हातात दंडुका घेऊन गुन्हेगारांच्या मुसक्या तर आवळल्याच. पण त्याचबरोबर कायद्याचा धाक व पोलिसांबद्दल चांगली प्रतिमाही निर्माण केली. त्यामुळे लोहाळकर हे 'दबंग' म्हणून कल्याण पूर्वेत आजही ओळखले जातात. पुणे ग्रामीण मधून सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरून निवृत्त झाल्यानंतरही ते कल्याण पूर्वेतील नागरिकांमध्ये संपर्कात राहिले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेमध्ये प्रवेश केल्यामुळे कल्याण पूर्वेतून ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.