कल्याण-डोंबिवली (ठाणे) - डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्टेशन रोडला असलेल्या लक्ष्मी निवास इमारतीमध्ये गुरुवारी (दि. 15 जुलै) दुपारी तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूरकोंडी झाली होती. इमारतीमधील रहिवाशांसह तळ मजल्यावरील दुकानदारांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. त्यामुळे जीवितहानी टळली असली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले असून तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीचे क्षणातच रौद्ररूप
डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलासमोरच लक्ष्मी निवास इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली. तेथील एका गोडाऊनमध्ये ही आग लागल्यानंतर आगीसह धुराचे प्रचंड लोट उठू लागले. या गोडाऊनमध्ये प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुरकोंडी झाली. ही आग पाहण्यासाठी जवळच्या पादचारी पुलावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. ऐन दुपारच्या वेळी रहदारीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला असल्याने अग्निशन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते.