ठाणे -मुरबाड-माळशेज या राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला आज दुपारच्या सुमारास टायर जवळ आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र चालक व वाहकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. या प्रसंगी माळशेज महामार्ग पोलिसांनी तात्काळ आग विझवण्यासाठी पाण्याची व्यवस्था करून प्रवाशांना पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली.
चालकाच्या वेळेत लक्षात आल्याने अनर्थ टळला..
धावत्या एसटीने घेतला पेट; वाहकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला - धावत्या बसने घेतला पेट
मुरबाड-माळशेज या राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला आज दुपारच्या सुमारास टायर जवळ आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र चालक व वाहकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
वसई-नगर-औरंगाबाद ही राज्य परिवहन महामंडळाची एसटी क्रमांक MH -14 -BT 2746 ही मुरबाड-माळशेज घाट या महामार्गावरून धावत असताना उमरोली गावाजवळ एसटीच्या मागील चाकांमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. यामुळे तात्काळ एसटी थांबवून पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी महामार्ग पोलीस केंद्र माळशेजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मतकर व महामार्ग पोलीस संजय घुडे यांनी तात्काळ सर्व प्रवाशांना एसटीमधून खाली उतरवून घाबरून जाऊ नका, तुम्ही सुरक्षित असल्याबाबत धीर दिला. वेळीच खबरदारी घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
टायरच्या अतिघर्षणामुळे व लायनर जळाल्याने धूर निघत असल्याचे सांगण्यात आले. मात्र भर उन्हात प्रवाशी रस्त्यावर उभे असल्याने पोलीस अधिकारी मतकर यांनी सर्व प्रवाशांना खासगी जीप व आपल्या महामार्ग पोलिसांच्या गाडीत बसवून उमरोली महामार्ग पोलीस चौकीत आणले. प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची व बसण्याची व्यवस्था केली. महामार्ग पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे व मोलाच्या सहकार्याच्या भूमिकेबाबत प्रवाशांनी यावेळी समाधान व्यक्त केले.