महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत गोदामांना आग; पुढील आठवड्यापासून बेकायदा गोदाम होणार सील - shahabaz shaikh

भिवंडीतील वळगाव येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील एका केमिकल गोदामाला सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग दहा तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करीत आटोक्यात आणली. यात मोठी आर्थिक हानी झाली.

घटनास्थावरील छायाचित्र

By

Published : Jul 23, 2019, 8:14 PM IST

ठाणे- भिवंडीतील वळगाव येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील एका केमिकल गोदामाला सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग १० तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करीत आटोक्यात आणली. मात्र, केमिकल गोडाऊन लगत असलेल्या रबर, डांबर, बेडशीट आणि फोम साठवून ठेवलेल्या गोदमांना या केमिकल गोदमांच्या आगीची झळ दुपारी दोन वाजल्याच्या सुमाराला लागल्याने हेही गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. मात्र, आज (मंगळवारी) सायंकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने इतर गोदामांच्या आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवून काही प्रमाणात आग आटोक्यात आली आहे.

भिवंडीतील गोदामांना आग
मात्र, पहाटेपासून आत्तापर्यंत भीषण आग विजवण्यासाठी भिवंडी, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, नवी मुंबई पाठोपाठ मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या ही मागवण्यात आल्या होत्या. मात्र, या ठिकाणी कूलिंगचे काम सुरू असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली ती प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.


प्रेरणा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका केमिकल गोदामाला सुरुवातीला आग लागली होती. ही आग भीषण स्वरूपाची असल्याने केमिकल गोदमांच्या लगत रबर, डांबर, बेडशीट, फोम गादी साठवून ठेवलेल्या गोदमांनाही आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याची अधिकृत माहिती मिळत नसली तरी शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज अग्निशामक दलाच्या जवानांकडून वर्तविला जात आहे.


तर दुसरीकडे भिवंडी शहर व ग्रामीण भागात केमिकल गोदामे मोठ्या प्रमाणात असून आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहे. मात्र, या आग लागल्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी पालिका, स्थानिक पोलीस प्रशासनाबरोबरच महसूल विभाग अजूनही ठोस भूमिका घेत नसल्याने भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विशेष म्हणजे भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात असलेल्या शेकडो गोदामांमध्ये बेकायदेशीरपणे रासायनिक द्रव्यांची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते. या बेकायदेशीर केमिकल साठ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले होते. मात्र, भिवंडी महसूल विभागाने या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या अनधिकृत गोदामांना वारंवार लहान मोठ्या आगी लागल्याच्या घटना रोज घडत आहेत. या घटनांमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

पुढील आढवड्यापासून बेकायदेशीर केमिकल गोदाम करणार सील


याबाबत भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता भिवंडीच्या गोदाम पट्ट्यातील केमिकल गोदामांना वारंवार आग लागत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रांताधिकारी डॉ. मोहन नाळदकर यांनी केमिकल गोडाऊन बंद करण्यासाठी ८५ गोदाम मालकांना नोटीस बजावल्या आहेत. या नोटिशीची मुदतदेखील संपली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून बेकायदेशीर केमिकल गोदामाला सील करण्याची कारवाई हाती घेतली जाणार असल्याचे डॉ.नाळदकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details