ठाणे : तक्रारदार प्रिया सक्सेना ह्या कल्याण शीळ मार्गावरील हायप्रोफाईल सोसायटी असलेल्या पलावा सिटीमध्ये राहतात. त्या १२ जानेवारी रोजी आरोपी सिमरनसोबत नवी मुंबई भागातील कामोठे येथे नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. मात्र, १३ जानेवारीला रात्री नऊच्या सुमारास कार्यक्रमातील गर्दीचा फायदा घेऊन आरोपी मावस बहीण सिमरनने प्रियाच्या पर्समधून घराची, तिजोरीची चावी आणि एंट्री कार्ड चोरी केले. विशेष म्हणजे, आपली चोरी पकडू नये म्हणून प्रिया यांचा वन पीस ड्रेस तिने परिधान केला होता. याशिवाय सोसायटीमधील सीसीटीव्हीमध्ये आपला चेहरा दिसू नये, यासाठी तिने चेहऱ्याला स्कार्फ देखील बांधला होता. त्यानंतर चोरलेल्या चावीने बंद घराचे कुलूप उघडून घरात प्रवेश करत २० लाखांचे ४० तोळे दागिन्यांची चोरी केली. विशेष म्हणजे, दागिने लंपास करून आरोपी सिमरन पुन्हा नवी मुंबईतील त्याच कार्यक्रमात पोहचली. त्याआधी तिने चोरी केलेले सर्व दागिने एका डॉक्टर मित्राकडे ठेवायला दिले होते.
बहिणीवरच चोरीचा होता संशय :तक्रारदार प्रियाने आपली पर्स काही घेण्यासाठी उघडली असता, पर्समधील चाव्या आणि एंट्री कार्ड गायब असल्याचे समजले. संशय आल्याने तिने घरी पोहोचल्यानंतर तिजोरी उघडून पहिले असता, त्यामधील सर्वच दागिने चोरीला गेल्याचे कळले. तक्रारदाराने १३ जानेवारी रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीची तक्रार दाखल केली आणि मावस बहिणीवर संशय व्यक्त केला. तर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे आणि पथकाने तपास सुरू केला.