ठाणे -पूर्ववैमनस्यातून हवेत गोळीबार करून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील भाल गावानजीक घडली. अविनाश अगिवले असे जीवघेणा हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिवसाढवळ्या तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पूर्ववैमनस्यातून हवेत गोळीबार करून तरूणावर जीवघेणा हल्ला - पूर्ववैमनस्यातून हवेत गोळीबार करून तरूणावर जीवघेणा हल्ला
पूर्ववैमनस्यातून हवेत गोळीबार करून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील भाल गावानजीक घडली. अविनाश अगिवले असे जीवघेणा हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिवसाढवळ्या तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अविनाश हा दोन मित्रांसह चारचाकी वाहनातून आपल्या ढोके गाव येथील आत्याच्या घरी गेला होता. त्याठिकाणाहून परतत असताना भाल गावाजवळील आयडियल कॉलेजच्या परिसरात सात जणांच्या टोळक्यांनी अविनाशची गाडी अडवली. यावेळी कुणाल म्हात्रे यांनी हवेत गोळीबार करून अविनाशला घाबरवण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांच्या मागून आलेल्या एका चारचाकी वाहनातील ५ ते ६ जणांनी त्याच्या जवळ असलेल्या विविध हत्यारांनी अविनाशवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अविनाश गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्या पाठीला, डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. अविनाशवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आपल्यावरील हल्ला हा पूर्ववैमनस्यातून झाल्याचे अविनाशने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात कुणाल म्हात्रे, राहुल पाटील आणि त्यांचे पाच ते सहा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींना अटक करण्यात आली नसून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.