ठाणे - राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्यातून शिवीगाळ करणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे. आव्हाड यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे फोटो फेसबुकवर प्रसारित करणाऱ्या सुनील रायभान पवार उर्फ सुनील राजे पवार याला औरंगाबादमधून ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याचा मोबाइलही जप्त केला आहे.
घटना काय होती?
८ एप्रिल रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. बनावट फेसबुक अकाऊंटच्या डीपीवर आव्हाड यांच्या कुटुंबाचा फोटो ठेवण्यात आला होता. या अकाउंटद्वारे अश्लील आणि शिवीगाळ असलेला मजकूर तसेच आव्हाड यांचे कौटुंबिक, वैयक्तिक फोटो प्रसारित करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सायबर सेलचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण वाघ, पोलीस नाईक अनुरोध गावित, कॉन्स्टेबल विजय अमर खरटमल, रवींद्र घोडके, गंगाधर तीर्थंकर, राजकुमार राठोड आणि सुजीतकुमार तायडे आदींच्या पथकाने १८ डिसेंबर रोजी औरंगाबाद क्रांतीनगर सिडको येथून सुनील याला अटक केली. आता न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली आहे.