ठाणे : नवी मुंबर्ई आणि अंबरनाथमधील बहुतांश शिवसेना नगरसेवकांनी शिंदे गटाला जाहीर पाठींबा दिल्यानंतर तब्बल 24 दिवसानंतर काल उल्हासनगर आणि भाईंदरातील नगरसेवकांनी आपली चुप्पी सोडत शिंंदे गटाला पाठींबा जाहीर केला. शिवसेनेतल्या बडांनंतर ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांनी ठाणे-पालघरावर लक्ष केंंद्रीत केलं होतं. मात्र ठाण्यातून खासदार राजन विचारे, कल्याणात जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, बाळ हरदास, बंड्या साळवी, भिवंडीचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील ही शिंदेंची माणसं सेनेतच राहिली. त्यामुळे शिंदे गटाला बालेकिल्ल्यातले अनेक बुरूज लढवावे लागतील याचा अंदाज आला होता. मात्र तब्बल 24 दिवसानंतर आता भाईंदर आणि उल्हासनगरच्या नगरसेवकांनी सेना सोडल्यामुळे शिंदेंच्या बालेकिल्ल्याला थोडी राहत मिळाली आहे.
संघर्ष करावाच लागेल -आता ही वस्तुस्थिती असली तरी आता दोन गट समोरासमोर अटळ असल्याचं चित्र उघड झालं असून, ठाणे आणि कल्याण या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर त्याचे ठळक पडसाद उमटतील हे स्पष्ट झालं आहे. याशिवाय पक्ष म्हणून मोठी भूमिका असलेल्या दोन्ही जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती, तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदेतले सदस्य मात्र अद्यापी सायलेन्स मोडवर आहेत. तर पक्ष म्हणूनही भिवंडी, वसई, शहापूर, मुरबाड, बदलापूर सारखी मोठी शहरांमधल्या पक्ष घटकांकडून अद्यापी निर्णय झालेला नाही. या गोष्टीदेखील शिंदे गटाला डोकेदुखी ठरू शकतात. त्यामुळे बालेकिल्ल्यात नगरसेवक गेले तरी गड झुंजत ठेवावा लागेल. संघर्ष करावाच लागेल असं चित्र आताच स्पष्ट होऊ लागले आहे.