ठाणे - भिवंडीत सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास पटेल कंपाऊंडमधील जिलानी नावाची इमारत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या जांबाज जवानांना ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ जणांचा जीव वाचविण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे घटनेची माहिती मिळताच सर्वात आधी घटनास्थळी पोहोचून त्यांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्याला सुरुवात केली होती. घटनेच्या ६० तासानंतरही मदतकार्य सुरू असून आतापर्यत ४१ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी आहेत. या दुर्घटनेनंतर भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने ५० टक्के रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख राजेश पवार यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखातीत दिली.
भिंवडीतील जिलानी नावाची इमारत अचानक कोसळल्याची घटना पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती भिवंडी अग्निशमन दलाला मिळताच दलाचे प्रमुख राजेश पवार हे १० ते १५ मिनिटात ७ ते ८ जवानांसह घटनास्थळी दाखल झालेे. त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्थानिकांच्या मदतीने बचावकार्यास सुरुवात केली होती.घटनेच्या दिवशी सकाळी ९ ते १० वाजेपर्यत ८ जणांना ढिगाऱ्याखालून जिवंत काढण्यात या पथकाला यश आले होते. तसेच १२ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्याची माहितीही भिवंडी अग्निशमन दलाचे प्रमुख पवार यांनी दिली.