ठाणे- उल्हासनगरच्या सर्वानंद रुग्णालयातील 180 पेक्षा अधिक कमर्चारी गेली 20 वर्षांपासून अतिशय तुटपुंज्या वेतनावर काम करत होते. कायद्यानुसार वेतन दिले जात नसल्याने या कामगारांनी मनसे कामगार संघटनेकडे धाव घेतली होती. त्यावर मनसे नेत्यांनी सर्वानंद रुग्णालयात जाऊन प्रशासनाला मनसे स्टाईलने जाब विचारताच प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे पगार दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प 5 या भागात स्वामी सर्वानंद ट्रस्टतर्फे सर्वानंद रुग्णालय चालवले जाते. या रुग्णालयात सध्या 180 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. त्यातील बहुतांशी कर्मचारी हे 20 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून कार्यरत आहेत. त्यांना अवघ्या 3 हजार ते 5 हजार रुपयांच्या मासिक वेतनावर काम करावे लागत होते. तर मेडिक्लेम व इतर सुविधाही दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे या प्रकरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी मनसे कामगार संघटनेकडे धाव घेत तक्रार केली.