ठाणे - गेल्या चार महिन्यात झपाट्याने वाढलेल्या कोरोनाचा प्रसार भिवंडी आणि उल्हासनगर महापालिका हद्दीत आटोक्यात आला आहे. सोमवारी भिवंडीत केवळ ५ कोरोना बाधित रुग्ण तर उल्हासनगर महापालिका हद्दीत ३३ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे येथील कोरोना आटोक्यात आल्याचे दिसून येते. मात्र कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी २१९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकट्या कल्याण-डोंबिवली शहरातील रुग्णांची संख्या ४८ हजार १०७ वर पोहोचली आहे. तर कल्याण डोंबिवलीत कोरोनामुळे सोमवारी आठ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ९६३ इतकी झाली आहे.
उद्योग नगरी समजल्या जाणाऱ्या दाटीवाटीच्या उल्हासनगरात सोमवारी ३३ नवे रुग्ण सापडल्यामुळे रुग्णांची संख्या ९ हजार ८९१ झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३२५ इतकी झाली आहे. तर कामगारचे शहर असलेल्या भिवंडीत केवळ पाच रुग्ण नव्याने आढळले असून एकही मृत्यू आज झाला नाही. त्यामुळे भिवंडी शहरात आतापर्यत बाधीत ६ हजार ६७४ रुग्णांची, तर ३२८ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.