ठाणे -नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घटल्याचे समोर आले आहे. मतांच्या घटलेल्या टक्केवारीचा फायदा सेना-भाजप युतीला होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ऐरोली मतदारसंघातील मतदानात लक्षणीय घसरण झाली असून २०१४ला ५७.४७ टक्के मतदान झाले होते. मात्र, यावर्षी ४२. ८९ टक्के मतदान झाले. बेलापूर मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत ४९.६६ टक्के मतदान झाले होते. मात्र,या निवडणुकीत ४५.३५ टक्के मतदान झाले.
नवी मुंबईतील नागरिकांध्ये यावर्षी २०१४च्या तुलनेत मतदानासंबधी उदासीनता पाहायला मिळाली. यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये तुर्भे, कोपरखैरणे, वाशी,नेरुळ परिसरामध्ये सकाळी सात ते आठच्या दरम्यान मोठ्या रांगा पाहायला मिळायच्या मात्र यावर्षी पूर्ण चित्र पालटले होते. सुरवातीच्या दोन तासात फक्त 4 टक्के मतदान पार पडल्याची नोंद करण्यात आली होती. कमी मतदानाची नोंद होतेय हे पाहून उमेदवार व कार्यकर्त्यांनी शक्य असेल त्या माध्यमातून मतदानाचे आवाहन करण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी मतदारांसाठी राजकीय पक्षांच्या माध्यमातून वाहनांची सोय करण्यात आली. दुपारनंतर मतदान करण्यासाठी नागरिकांची संख्या वाढू लागली.
मतदानावेळी काही ठिकाणी शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या तर मतदान केंद्रात वीज जाणे, चुकीचे फोटो लागणे यामुळे मात्र चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.मात्र, दोन्ही मतदार संघात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही व मतदान शांततेत पार पडले.
राजकीय पक्षात एकनिष्ठा राहिली नाही कोणत्याही पक्षाचा आदर्श राहिला नाही, शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीत असलेले सगळे भाजपमध्ये गेले भाजपनेही त्यांना स्वीकारलं. आपण व्यक्तीला मतदान करावे, पक्षाला मतदान करावे की तत्वाला करावे? यामुळे नागरीक संभ्रमात राहिले, याचा परिणाम मतांच्या टक्केवारीवर झाला असे मत ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर यांनी म्हटले. नवी मुंबईतील नागरिकांचे प्रश्न वर्षोनुवर्षे सुटले नाहीत, प्रकल्पग्रस्त, सिडको वसाहतीत राहणारे नागरिक, झोपडपट्टीत राहणारे नागरिक यांच्या घरांचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत, त्यामुळे मतदारांमध्ये नैराश्याची भावना होती. आपलं काहीच राहील नाही असंही लोकांना वाटत आहे. नवी मुंबई कॉसमापॉलिटीन शहर आहे, त्यामुळे इथं लोक रोजीरोटीच्या मागे लागले आहेत. त्यांना या मतदानाच्या प्रक्रियेत रस दिसत नाही. त्याचाही परिणाम कमी मतदानावर झाला आहे. मतदानाची टक्केवारी वाढली नाही कमी मतदान झालं याचा फायदा नक्कीच सेना भाजप युतीला होईल, असे देखील विश्वरथ नायर यांनी सांगितले.
मतदान कमी होण्याची कारणे -
नवी मुंबईतील स्थानिक ग्रामस्थांची नाराजी, गावठाण विस्तार व आहे ती घरे बांधण्यासंबधी लादल्या जाणाऱ्या जाचक अटी, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून याबाबत कोणत्याही प्रकारे ठोस पाऊल न उचलणे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी मतदानाकडे पाठ फिरवली.
सिडको वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांच्या २.५ वाढीव घरासंबंधीच्या जाचक अटी व लोकप्रतिनिधी यांची उदासीनता, दरवेळी निवडणुकीच्या दरम्यान तीच तीच दिली जाणारी आश्वासने मात्र त्याची कधीही न होणारी पूर्तता, दिवाळीची सुट्टी, नवी मुंबईतील मतदारांचे गावी मतदान आणि नव-मतदात्यांची यादीत नावांची नोंद न होणे या कारणांमुळे मताची टक्केवारी कमी झाली.