ठाणे - जिल्ह्यातील भिवंडी-वाडा मार्गावरील खड्ड्यांनी डॉक्टर तरुणीचा बळी घेतल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. येत्या ८ नोव्हेंबरला तिचे लग्न होणार होते. मात्र, अंगाला हळद लागण्यापूर्वीच खड्ड्याने तिचा बळी घेतला.
अंगाला हळद लागण्यापूर्वीच रस्त्यांवरील खड्ड्यांनी घेतला डॉक्टर तरुणीचा बळी - डॉक्टर तरुणीचा अपघात
ठाण्यातील डॉक्टर तरुणीचे येत्या ८ नोव्हेंबरला लग्न होते. त्यासाठी ती खरेदी करायला गेली. मात्र, परत येताना वाटेतील रस्त्यांनी तिचा बळी घेतला.
डॉ. नेहा आलमगीर शेख (२३), असे मृत तरुणीचे नाव आहे. तिचे लग्न मुंब्रा-कौसा येथील डॉक्टर मुलाशी होणार होते. त्यासाठीच ती बुधवारी रात्रीच्या सुमारास लग्नाची खरेदी करून भावाच्या मोपेडवरून कुडूस येथील घरी जात होती. मात्र, रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये त्यांची दुचाकी आदळली. त्यामध्ये नेहा खाली पडली. तेवढ्यात पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनगाव येथील टोल नाका मध्यरात्री बंद पाडला होता. तसेच गुरुवारी नागरिकांनी रास्ता रोको करीत सुप्रीम कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.