ठाणे Diwali Festival 2023: फराळ पणत्या, कंदील, फटाके यांच्यासह माती दगडांचे किल्ले बनविणं हा देखील दिवाळीचा (Diwali) अविभाज्य भाग आहे. लहान मुले माती, दगड, विटा जमवून सुरेख किल्ले साकारत असतात. परंतु शहरांचे आधुनिकीकरण झाल्यानंतर किल्ले बनवण्यासाठी जागाच उरली नसल्याचं विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळं रस्ते आणि पदपथांवर किल्ले बनवण्यावाचून मुलांसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही.
बाजारामध्ये नागरिकांची गर्दी : दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आता केवळ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घराघरात गृहिणींचे फराळ बनवण्यासाठी लगबग पाहायला मिळत आहे. संध्याकाळी कामावरून घरी जाताना कंदील, पणत्या, रांगोळ्या, तोरण इत्यादी सामान खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये नागरिकांची गर्दी दिसत आहे. याच गडबडीत काही मुलं मात्र रस्त्यांवर आणि पदपथांवर माती कालवून व दगड रचत किल्ले बनवताना दिसत आहेत.
शहरांचे आधुनिकीकरण झाले :पूर्वी किल्ले बनवणं हा प्रत्येक मुलाचा छंद होता आणि प्रत्येक घरासमोर दिवाळीत एक किल्ला पाहायला मिळत होता. या किल्ल्यावर सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे विकत घेण्यासाठी मुले खाऊमधील थोडे थोडे पैसे वाचवतात. आपला किल्ला सर्वोत्तम असावा यासाठी मुलं प्रचंड मेहनत घेतात. माती आणि दगडांच्या गोणी डोक्यावर घेत ही मुलं उत्साहाने किल्ल्याच्या बांधकामाला लागतात. रायगडाचे बांधकाम करणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांच्याप्रमाणेच अभिमानाचे भाव प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतात. परंतु काळ बदलला आणि रस्त्या शहरांचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण झाले. मातीचे रस्ते जाऊन सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते आले.