ठाणे Diwali 2023 : नवी मुंबईतल्या एका गावात दिवाळी फारच विशेष आणि अनोखी साजरी केली जाते. या गावाचं नाव देखाल 'दिवाळे गाव' असं आहे. गावातील बहिरी या देवाची मूर्ती समुद्रातून आणली जाते. यासाठी विशेष शोध मोहीम घेतली जाते. शोध मोहिमेमध्ये देवाची मूर्ती मिळाल्यानंतर मोठा जल्लोष साजरा केला जातो. विशेष म्हणजे दिवाळे गावाशेजारील अनेक गावातील लोक या बहिरी देवाच्या मूर्तीच्या शोधासाठी बोटीने समुद्रात जातात. मात्र तरी देखील ही मूर्ती खूप प्रयत्न करुनही लवकर मिळत नसल्याचं गावकरी सांगतात. या गावातीलच नाही तर आसपासच्या गावातील शेकडो बोटी या देवांचा शोध घेण्यासाठी समुद्रात जातात, असंही सांगण्यात येतं.
दिवाळे गावात असे फोडतात फटाके : दिवाळे गावातील तांडेल कुटुंबीयांना अनेक पिढ्यांपासून मिळालेल्या मूर्तीनंतर ती अनोखी पूजा केली जाते. भाऊबीज झाल्यानंतर या मूर्तीचं पुन्हा समुद्रामध्ये विसर्जन केलं जातं. तसंच पुढच्या वर्षीच्या दिवाळीच्या आधी पुन्हा एकदा या देवाच्या शोध मोहिमेची सुरुवात होते. अनेक दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही कायम आहे. 'दिवाळे' गावात दिवाळी सणानिमित्त या पूजेनंतर मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. हे फटाके सामान्यतः फोडले जात नाही तर, एकमेकांच्या अंगावर फेकून हे फटाके फोडले जातात. यात कोणी जखमी झालं तरी कोणीही तक्रारी करत नाही. सामान्यतः फटाके फोडताना अनेकांचे कपडे जळणं, जखमा होणं या किरकोळ गोष्टी समजल्या जातात. तसेच दिवाळी दरम्यान या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन देखील केलं जातं.