ठाणे - जिल्हा परिषदेच्या बनावट शिक्यांचा तसेच अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन अनधिकृत इमारतींमधील घरे ग्राहकांच्या माथी मारणारी टोळी सक्रिय होती. या टोळीने तब्बल 76 इमारतींच्या बनावट बांधकाम परवानग्या तयार केल्या होत्या. या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून बाळकृष्ण कर्वे या दलालासह तब्बल 74 बांधकाम व्यवसायिकां विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बनावट शिक्यांच्या आधारे घरे विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल 74 बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल - कल्याण-डोंबिवली
जिल्हा परिषदेच्या बनावट शिक्यांचा तसेच अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन अनधिकृत इमारतींमधील घरे ग्राहकांच्या माथी मारणारी टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. यात बाळकृष्ण कर्वे या दलालासह तब्बल 74 बांधकाम व्यवसायिकां विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात भूमाफियावर गुन्हा दाखल केल्याची ही पहिलीच वेळ असून या दाखल गुन्ह्यामुळे ग्रामीण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावांमध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहेत. या अनधिकृत इमारती मधील घरे ग्राहकांना अवैधरित्या वाटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बनावट शिक्यांचा तसेच अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांद्वारे इमारत बांधकाम परवानगी तयार केल्या जात होते. इमारतीमधील घरांची अधिकृत नोंदणी व विक्री करून यामध्ये शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविण्यात आला आहे. तसेच ग्राहकांची आणि या घरांवर कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांची देखील फसवणूक केल्याप्रकरणी सहाय्यक गटविकास अधिकारी रूपाली बांगर यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळकृष्ण कर्वे यांच्यासह तब्बल 74 बांधकाम व्यवसायकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान मानपाडा पोलिसांनी हा गुन्हा उल्हासनगर गुन्हे शाखेकडे सोपवला. यापूर्वी देखील आरोपी कर्वे विरोधात याच प्रकारचे गुन्हे दाखल असतानाही त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्याला कायद्याचा धाक उरला नसल्याचे दिसून येते. आरोपी कर्वे वारंवार त्याच प्रकारचे गुन्हे करित नागरिकांची फसवणूक करण्याबरोबरच शासनाचेही आर्थिक नुकसान केले आहे. तर इतक्या मोठ्या संख्येने बांधकाम व्यवसायिका विरोधात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे आता तरी पोलीस कारवाई करणार का ? असा सवाल फसवणूक झालेल्या नागरिकांनी उपस्थित केला आहे. अधिक तपासासाठी हा गुन्हा उल्हासनगर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.