ठाणे :पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी वाय. एम तडवी यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्या संपूर्ण टीमला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी शहरातील पाणी साचत असलेल्या सखल भागात पाहणी केली. पावसाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने आपत्ती कर्मचाऱ्यांसह ठाणे पालिकेच्या टीडीआरएफमधील ३३ जवानांच्या सुट्ट्या ४ महिन्यांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरीने गारवा : सध्या सुरू असलेला मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल झाला असून, शनिवारी सकाळपासून रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरीने गारवा निर्माण केला. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ठाणे शहरात शनिवारी दिवसभरात 5.57 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अलर्ट राहण्याच्या सूचना :उष्णतेने हैराण झालेल्या ठाणेकरांना शुक्रवारीपासून थोडा फार का होईना दिलासा मिळाला आहे. ठाणे शहरातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने काही काळ गारवा निर्माण झाला. शहरात शनिवारी दिवसभर ढगाळ हवामान पहायला मिळाले. आपत्ती कालावधीत काम करताना तलाव, रस्ते, घरे, वीज यंत्रणा याबाबत सातत्याने आढावा घेतला जाणार आहे. पावसाळ्यात साथरोग वेगाने पसरतात असतात. याच अनुषंगाने साथरोगाची संभाव्यता लक्षात घेता औषधांचा मुबलक प्रमाणातसाठा पालिका प्रशासनाने ठेवला आहे. तसेच निवारा केंद्रे, अन्नपुरवठा, बोटी याबाबतही दक्षता घेतली गेली आहे. तसेच प्रभाग समितीनुसार सर्वांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी तडवी यांनी सांगितले.
एनडीआरएफ पथक १ जुलै पासून ठाण्यात :नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास संवेदनशील भागात पूरसदृश परिस्थितीत उपाययोजना करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात एनडीआरएफचे पथक नेमण्यात आले आहे. त्यानुषंगाने सदर पथकासाठी आवश्यक वाहन व्यवस्था, इतर सामग्री, पथकाचे निवास तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. १ जुलै ते ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत म्हणजेच १ महिना एनडीआरएफचे पथक ठाण्यात तळ ठोकून असणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास हा कालावधी वाढवण्यात येईल असे, राज्य सरकारने लेखी पत्र काढून कळवले आहे.
हेही वाचा -Weather Update : मान्सून देशाचे नंदनवन काश्मिरात आधी तर महाराष्ट्रात नंतर, वाचा असे का?