ठाणे-राज्यात कोरोनाशी लढण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा, पोलीस, अत्यावश्यक सेवा सज्ज आहेत. लॉकडाऊनच्या पोलिसांवरील ताण अधिक वाढला आहे. या काळात पोलिसांच्या जीवाला कोरोनामुळे धोका निर्माण झाला आहे. अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामूळे त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ठाण्यात देखील कोरोना संसर्ग वाढत असल्याची बाबा लक्षात घेऊन ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान ही संघटना पोलिसांच्या मदतीला सरसावली असून संघटनेच्यावतीने ठाणे शहर पोलिसांना व ठाणे ग्रामीण पोलिसांना प्रत्येकी १०० पीपीई किट देण्यात आल्या आहे.
पोलिसांच्या आरोग्य रक्षणासाठी धनगर प्रतिष्ठानही पुढे सरसावले - Vivek Fanaslakar
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्या जीवाची पर्व न करता रस्त्यावर आहोरात्र लढणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान या संघटनेच्या वतीने पोलिसांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व ग्रामीण पोलीस अधीक्षक शिवाजीराव राठोड यांच्याकडे या पीपीई किट संघटनेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे व कार्याध्यक्ष महेश गुंड यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. या पीपीई किटसाठी धनगर समाजाचे युवा कार्यकर्ते उद्योजक संदेश कवितके यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
ठाणे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा या काळात आरोग्याचा धोका पत्कारुन १६-१६ तास कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही हे आपले देखील कर्तव्य आहे. या भावनेने धनगर प्रतिष्ठानच्यावतीने या पीपीई किटचे वाटप करण्यात आल्याचे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी यावेळी सांगितले.