ठाणे - पाय घसरून नदी पात्रात बुडालेल्या व्यक्तीचा 22 तासानंतर मृतदेह शोधण्यास आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आले आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील वासिंद शहरालगत असलेल्या भातसा नदी पात्रात घडली. या प्रकरणी वाशिंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सखाराम चाहू केवारी (रा. मु. विंचूपाडा, पोस्ट दळखन, ता.शहापूर), असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
नदीतील कपारीत आढळला मृतदेह
मृत सखाराम हे शुक्रवारी (दि. 22) सकाळच्या सुमारास वासिंद शहरालगत वाहणाऱ्या भातसा नदीवर गेले होते. मात्र, त्याचा अचानक पाय घसरून पाण्यात वाहून गेल्याचे एका नातेवाईकाने पहिले. त्यांनतर शहापूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख श्याम धुमाळ यांना मृताच्या नातेवाईकांनी संपर्क करून नदीत पात्रात शोधकार्य घेण्यास मदत मागितली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी 10 वाजता नदी पात्रात शोधकार्य सुरू केले. शोधकार्य अंधारपडे पर्यंत सुरू ठेवले होते. मात्र, शोधकार्या दरम्यान मृतदेह नदीच्या कपारीत असल्याचे पथकाच्या सदस्यांच्या लक्षात आले. त्यानंतर रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवून रात्री उशिरापर्यंत पथकाचे सदस्य घटनास्थळी थांबून होते. आज (दि. 23) सकाळी 6 वाजल्यापासून नदी पात्रात पुन्हा पथकाचे सदस्य उतरले असता त्यांनी मृतदेह कपारीतून बाहेर काढला.