ठाणे :दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर पत्नी आणि तिन्ही मुलांच्या मृतदेह पाहून वडिलांनाही विष प्राशन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भिवंडी तालुक्यातील उंबरखांड पाच्छापूर जंगलात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. श्रीपत बच्चू बांगरी असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तर पत्नी रंजना (वय ३०), मुलगी दर्शना (वय १२), रोहिणी (वय ६) आणि मुलगा रोहित (वय ९) असे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या चौघांची नावे आहेत.
२१ ऑक्टोबरला केली होती बेपत्ता असल्याची तक्रार..
श्रीपत यांनी २१ ऑक्टोबरला हे चौघे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुरुवारी दुपारच्या सुमारास श्रीपतचा भाऊ जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला असता, त्याला एका झाडावरून दुर्गंधी आली. त्यामुळे त्याने पहिले असता, झाडाला सडलेल्या अवस्थेत चारही मृतदेह आढळून आले. मृतदेहांच्या अंगावरील कपड्यांमुळे त्यांची ओळख पटल्याने घटनेची माहिती भावाने श्रीपतला दिली. त्यानंतर पत्नी आणि ३ मुलांच्या मृत्यूंची बातमी मिळताच श्रीपतने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच ठाणे ग्रामीण विभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, आणि पडघा पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तर फॉंरेन्सिक पथकही घटनास्थळी आले होते. तब्बल दोन महिन्यांपासून चौघांच्या मृतदेहाचे सांगाडे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
काही दिवसांपूर्वीच घडली होती अशीच घटना..
काही दिवसापूर्वीच शहापूर तालुक्यातील खर्डी नजीकच्या जंगलात तिघांचे मृतदेह आढळून आले होते. मात्र पोलीस तपासाअंती या तिघांनी तंत्रमंत्र विद्या शिकण्यासाठी व अमर होण्यासाठी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. आता अश्याच प्रकारे झाडाला सडलेल्या व लटकलेल्या अवस्थेत चारही माय-लेकांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे.