ठाणे- कुख्यात गुंड सिद्धेश बाळा म्हसकर उर्फ सिद्धू अभंगे (वय 27 वर्षे) याच्यावर ठाणे पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर त्याची नाशिक मध्यवर्ती तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - कल्याणात 35 लाख रुपयांच्या मोबाईलसह चौकडी ताब्यात
खुनाचा प्रयत्न, खंडणी, अवैद्य हत्यार बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे, हाणामारी व अमली पदार्थ विक्री आदी गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी सिद्धू आणि त्याच्या आठ ते दहा साथिदारांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिद्धू आणि त्याच्या साथीदारांनी बंदूक आणि लाठ्याकाठ्या घेऊन दहशत पसरविल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच त्याच्यावर कोपरी पोलिसात आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व गुन्ह्यात अभंगे जामिनावर बाहेर होता.