सिमकार्ड घोटाळ्या प्रकरणी एसीपीची प्रतिक्रिया ठाणे : हा प्रकार डोंबिवली रेल्वे स्थानक पोलिसांनी मारलेल्या छापेमारीत समोर आला. त्यामुळे तुमच्या दस्तावेजचा वापर करून तुमच्या नावाच्या सिमकार्डवरून गुन्हा घडू शकतो. यामुळे तुम्हालाच तुरुंगवास भोगावा लागेल. त्यामुळे अधिकृत दुकानातून सिमकार्ड घेण्याचे आवाहन पोलीस करत आहेत. छापेमारीत एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. हर्षदा सुरेश पराडकर (रा. उल्हासनगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
सिमकार्डचा घोटाळा उघडकीस:डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात दुकानाचे अधिकृत कोड वापरत रस्त्यावर सिमकार्डचे स्टॉल लावले जातात. यानंतर सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत सिमकार्डची विक्री होत असल्याची माहिती डोंबिवलीचे एसीपी सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार डोंबिवली एसीपी सुनील कुऱ्हाडे व मालपाणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी मिळून डोंबिवली स्टेशन परिसरात छापा टाकला. दरम्यान, हर्षदा सुरेश पराडकर नावाच्या महिलेला ताब्यात घेण्यात आले.
अशी करायची सिमकार्ड अॅक्टिव्ह:चौकशीत ही महिला डोंबिवली पूर्वेतील गणेश इलेक्ट्रिक शॉपचे डीलर कोड वापरून स्टेशन परिसरात वोडाफोन-आयडियाचे सिमकार्ड रस्त्यावरच स्टॉल लावून विकते. ती सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांच्या आधारकार्डवर वेगवेगळे फोटो लावून बनावट आधारकार्ड तयार करते. त्यानंतर बनावट आधारकार्डच्या आधारे नवीन सिमकार्ड अॅक्टिव्ह करीत होती.
170 सिमकार्ड जप्त:डोंबिवली पोलिसांनी या महिलेला बेड्या ठोकत या महिलेकडून 170 जणांच्या नावाने सिमकार्ड जप्त केले. तिने आणखी किती ग्राहकांना सिमकार्ड विकले याची माहिती पोलीस घेत आहेत. तर टेलि कम्युनिकेशन विभागाकडून चुकीच्या पद्धतीने सिमकार्ड विकणाऱ्यांची यादी पाठवण्यात आली आहे. यानुसार राज्यात सर्व ठिकाणी छापेमारी सुरू असून ग्राहकांनी स्टेशन परिसर किंवा अनधिकृत दुकानदाराकडून सिमकार्ड घेऊ नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
तर तुरुंगात जाल:तुमच्या दस्तावेजच्या आधारे तुमच्या नावावर दुसरे सिमकार्ड काढून त्यावर कुठल्याही प्रकारचे क्राईम झाल्यास तुम्हालाच तुरुंगवास भोगावा लागेल. त्यामुळे अधिकृत विक्रेत्याकडूनच सिमकार्ड घ्यावे, असे आवाहन डोंबिवली पोलीस करत आहे. खळबळजनक बाब म्हणजे, अटक महिला ही सिमकार्ड जास्त पैशात विक्री करत होती. हे सिमकार्ड ऑनलाइन फसवणूक धमकी व सोशल मीडियावर विविध गुन्हे करण्यासाठी वापरले जात असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली गेली आहे.
हेही वाचा:
- Religious Conversion In Delhi : राजधानीत जबरदस्तीने धर्मांतरण, उच्च शिक्षित तरुणाच्या मोबाईलमध्ये आढळली खळबळजनक माहिती
- Triple Murder In Bihar : माथेफिरू बापलेकांनी चाकूने भोसकले; जमिनीच्या वादातून घडले तिघांचे हत्याकांड, अनेकजण जखमी
- Beed Crime News: महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी; चोरट्यांनी मारला साडेबारा लाखावर डल्ला