ठाणे - ५ वर्षीय सख्या चुलत बहिणीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी १३ वर्षीय चुलत भावाला बाल न्यायालयाने १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दिवाळी सणासाठी फटाक्यांचे आमिष दाखवून पीडितेवर आरोपीने अत्याचार केले होते. कोनगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरवली पाडा येथे ही घटना घडली होती.
हेही वाचा -चारित्र्याच्या संशयावरून पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला; हल्ल्यात पत्नी अन् सासू गंभीर जखमी
पीडितेचे कुटुंब मुळचे बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या साडेसहा वर्षांपासून ते सरवली येथील एमआयडीसीमध्ये मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवतात. २८ ऑक्टोबर २०१९ रोजी पीडिता घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली होती. सर्वत्र शोध घेतला असता सरवली येथील पाईपलाईन लगतच्या झुडुपात तिचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय साबळे यांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. त्यांनतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता.
हेही वाचा -'शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ही म्हण खोटी ठरवावी'
वैद्यकीय अहवालानुसार चिमुरडीवर बलात्कार करून तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी कोनगांव पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादंवि. ३६३, ३०२, २०१, ३६४, ३६६ (अ), ३७६ सह लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,९ (ह ) १० प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून अवघ्या २४ तासात पोलिसांनी ६ व्या वर्गात शिकणाऱ्या पीडितेच्या सख्या चुलत भावाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीअंती हा गुन्हा केल्याची कबुली आरोपीने दिली. या आरोपीला बाल न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांच्या पथकाने बाल न्यायालयात ५० दिवसात दोषारोपपत्र सादर केले. यावर बाल न्यायालयात अंतिम सुनावणी होऊन १३ वर्षीय विधिसंघर्ष आरोपीला १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.