महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बांधकाम मजूर राहणार मतदानापासून वंचित; ठाण्यात गळ्यात विटा अडकवून आंदोलन - worker

कासारवडवली येथील साईनाथनगर मजूर नाक्यावर भर उन्हात मजुरांनी कामगार आयुक्त, पोलीस आणि ठेकेदारांच्याविरोधात अर्धनग्न निषेध आंदोलन केले.

बांधकाम मजूर

By

Published : Apr 22, 2019, 11:42 PM IST

ठाणे- आम्हालाही मतदान करून कर्तव्य बजवायचे आहे. ठेकेदाराने गेल्या दोन वर्षांपासून आमच्या कामाची मजुरी दिली नसल्याने या निवडणुकीत आम्हाला मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार असल्याची खंत नाक्यावर काम करणाऱ्या मजुरांनी व्यक्त केली आहे. परप्रांतामधून हे मजूर ठाण्यात कामासाठी आलेले आहेत. काम करूनही ठेकेदाराने त्यांची सुमारे ३० लाखांची मजुरी दिली नसल्याने या मजुरांनी शासन आणि ठेकेदारांच्याविरोधात भर उन्हात अर्धनग्न होऊन गळ्यात विटांच्या माळा घालून आपला रोष व्यक्त केला.

कासारवडवली येथील साईनाथनगर मजूर नाक्यावर भर उन्हात मजुरांनी कामगार आयुक्त, पोलीस आणि ठेकेदारांच्याविरोधात अर्धनग्न निषेध आंदोलन केले. कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिरानंदानी पातलीपाडा येथील टीसीएस कंपनीचे बांधकाम करणाऱ्या मजुरांना त्यांची चार महिन्याची मजुरी मिळाली नाही. ठेकेदार राहुल पटेल यांनी गेल्या दोन वर्षांपासून त्यांना मजुरीचे पैसे अदा केले नाहीत. मजुरीचे पैसे मागितल्यास मजुरांना खाडीत फेकून देईल, अशी धमकी दिली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून हे मजूर ठेकेदारकडे चकरा मारत आहेत. पोलीस आणि कामगार आयुक्त कार्यालयात जाऊनही त्यांना न्याय मिळाला नसल्याचा आरोप स्वाभिमानी रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियनचे अध्यक्ष भोला मंडल यांनी केला आहे. कांदिवली येथील ४० मजुरांची २५ लाखांची मजुरी तेथील ठेकेदार हेमंत आणि राकेश यादव यांनी दिली नाही. त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी अशी मागणी मजुरांनी केली आहे.

इमारत बांधकामाच्या ठिकाणी ठेकेदार मोठ्या प्रमाणात मजुरांची मजुरी लुटत आहेत. देशभरातून कामाच्या शोधात आलेल्या या मजुरांची मजुरी न मिळाल्याने या निवडणुकीत गावी जाऊन मतदान कसे करणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे आम्हाला मतदानापासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी मजुरांनी केली.

यावेळी भर उन्हात मजुरांनी अंगावरचे कपडे काढून अर्धनग्न होत गळ्यात विटा, डोक्यावर घमेले, हातात फावडे आणि थापी घेऊन निषेध केला. या प्रसंगी युनियनचे अध्यक्ष भोला मंडल, उपाध्यक्षा उषाताई काटे आणि नाकाकामागर, मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details