ठाणे- महाराष्ट्रात वरिष्ठ पातळीवर महाशिवआघाडी अजूनही डळमळीत असतानाच ठाणे काँग्रेसमधून मात्र ठाण्यातील शिवसेना नेतृत्वावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे बोलतात एक आणि करतात एक अशी भूमिका असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला. जर महाशिवआघाडी होत असेल तर जिल्हास्तरावर बैठक घेऊन विश्वासात घ्यावे. अन्यथा काँग्रेसचा मूळ कार्यकर्ता काँग्रेसच्या विचारधारेपासून दुरावले आणि उर्वरित काँग्रेस मात्र संपायला वेळ लागणार नाही, असा गर्भगळीत इशाराच वर्तकनगर काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत दिला.
एकनाथ शिंदे बोलतात एक वागतात एक, ठाणे काँग्रेसचा आरोप
शिवसेना आणि एकनाथ शिंदे बोलतात एक आणि करतात एक अशी भूमिका असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाआघाडीचे पडघम आणि हालचाली जोरदार सुरु आहेत. मात्र जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांचा विचार वरिष्ठ नेते करत नाहीत. महाशिवआघाडीला काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध नाही. पण, जिल्हास्तरावरील कार्यकर्त्याला विचारात घेऊन निर्णय घ्यावा. ठाण्यात विधानसभेत राष्ट्रवादीला ठाणे शहर विधानसभा जागा सोडली. राष्ट्रवादीने ती जागा मनसेला सोडली. मात्र, ओवळा माजिवडा आणि कोपरी विधानसभा मतदार संघात मनसेने उमेदवार दिला मतांची विभागणी झाली. दुसरीकडे शिवसेना आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे हे बोलतात एक आणि करतात एक, अशी भूमिका असल्याचा आरोपही विक्रांत चव्हाण यांनी केला. वरिष्ठांनी ज्याच्या बरोबर जपायचे त्याच्याशी अटीशर्थीं मान्य करूनच जावे. जर तसे झाले नाही तर मात्र काँग्रेसचा मूळ कार्यकर्ता हा काँग्रेसच्या विचारापासून दूर जाईल आणि मग उरलेली काँग्रेस संपुष्टात येईल असा इशाराही विक्रांत चव्हाण यांनी दिला.
या पत्रकार परिषदेत विक्रांत चव्हाण, काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे आणि रवींद्र आंग्रे यांच्यासह अन्य नेत्यांची उपस्थिती होती. जर महाशिवआघाडी होणार असेल तर ठाणे टोलमुक्त करावे आणि दीपाली भगत यांचे सदस्य पद पुन्हा द्यावे, अशा मागण्याचा अजेंडाही पत्रकार परिषदेत मांडला.