ठाणे- दिल्लीमधील दंगलीला काँग्रेस आणि आम आदमी पक्षच जबाबदार आहे. त्यांनी ठरवले असते तर ही दंगल नियंत्रणात येऊ शकली असती. त्याचबरोबर, ज्या संजय राऊतमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले त्यांच्यावर पक्षाने अन्याय केला आहे. किमान त्यांना सामनाचे संपादक पद तरी द्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिली आहे.
खासदार रामदास आठवले हे ठाण्यातील मो.ह. विद्यालयात शांताबाई कृष्णा कांबळे यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, मनसेचे राज ठाकरे यांनी जर प्रांतवादाची भूमिका सोडली तर त्यांचे महायुतीत स्वागत आहे. परंतु, ते येण्या न येण्याने महायुतीला काही फरक पडणार नाही, असे आठवले यांनी सांगितले. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाने जर ठरविले असते तर दिल्लीची दंगल भडकली नसती. परंतु, आम आदमी पक्षाच्या नगरसेवकाने ही दंगल भडकवली. काँग्रेसने ती आणखीनच भडकवली, असा आरोप आठवले यांनी केला. केंद्रात आमचे सरकार असल्याने दंगलीसाठी आम्ही कसे जबाबदार? असा सवालही आठवले यांनी आरोप करणाऱ्यांना केला.