ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जीवनाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. मी प्रशिक्षणासाठी जात असताना वाटेत माझा प्लॅन बदलला नसता तर कदाचित मी आज भारतीय सैन्यात सेवा करत असतो, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी शिवसेनेशी बंड करून मुख्यमंत्री बनलेल्या 59 वर्षीय एकनाथ शिंदेंनी सांगितले की, त्यांना त्यांच्या या निर्णयाबद्दल खेद वाटत नाही. त्यांची भारतीय सैन्यात निवड झाली होती आणि त्यांना लखनौमध्ये प्रशिक्षण घेण्यास बोलवण्यात आले होते, अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली.
प्रशिक्षणाला जाताना मार्ग बदलला : शिंदे म्हणाले की, प्रशिक्षणासाठी लखनौला जाताना त्यांना त्यांचे मित्र हरी परमार यांचे हरियाणातील रोहतक येथे एका लग्नाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण आठवले. त्यानंतर त्यांनी मार्ग बदलला आणि दिल्लीहून रोहतक गाठले. तीन - चार दिवसांनंतर ते लखनौ येथील प्रशिक्षण केंद्रात पोहोचले. मात्र, शिंदे यांना सांगण्यात आले की त्यांची बस चुकली असून त्यांनी प्रशिक्षणासाठी नव्याने वॉरंट घेऊन परत यावे. शिंदे म्हणाले की, मुंबईत परतल्यावर तिथे दंगली सुरू होत्या आणि त्यामुळे त्यांनी हे प्रकरण जसेच्या तसे सोडले आणि ते पुढे राजकारणात यशस्वी झाले.