कल्याण - लग्नाच्या मिरवणुकीत झगमगाट रहावा यासाठी विजेची छत्री बालमजुराच्या हातात देण्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे. या मुलांच्या वयाच्या मानाने छत्रीचे वजन जास्त आहे. तसेच, विजेचा प्रवाह असल्याने ते धोकादायकही आहे. बालमजुरी करुन घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरीही बालकांकडून मजूरी करुन घेण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.
लग्नाच्या वरातीत ३ ते ४ तास ही छत्री घेऊन मुलांना चालावे लागते. मात्र, गरजेपोटी मुले ही कामे करतात. त्यांच्या गरजेचा फायदा घेऊन मंगल कार्यालयेही त्यांच्याकडून कुठलीही कामे करवून घेताना दिसतात. या बदल्यात त्यांना दिवसाला १५० ते २०० रुपये असा अतिशय तुटपुंजी मजुरी दिली जाते. कल्याणमधील लालचौकी ते बैलबाजार मार्गावर हा प्रकार सर्रास दिसून येत आहे. या रस्त्यावर ८ ते १० मंगल कार्यालये आहेत. ती बिनधोकपणे बालकामगारांकडून काम करवून घेतात.