महाराष्ट्र

maharashtra

Kalwa Hospital Thane : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यूचे तांडव; 48 तासात 18 रुग्ण दगावले, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

By

Published : Aug 13, 2023, 11:52 AM IST

Updated : Aug 13, 2023, 10:22 PM IST

एका दिवसात 5 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा कळवा येथील शासकीय रुग्णालय चर्चेत आले आहे. या रुग्णालयात 48 तासात 18 रुग्णांचे मृत्यू (Kalwa Hospital) झाल्याने रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणावरुन आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला धारेवर धरले आहे. तर प्रकरणाची चौकशी करुन अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याचे ठाणे पालिका आयुक्तांनी सांगितले आहे.

chhatrapati Shivaji Maharaj Hospital Kalwa
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णाल कळवा

प्रतिक्रिया देताना मंत्री दीपक केसरकर

ठाणे - कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कारभार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात (Kalwa Hospital) सापडला आहे. या रुग्णालयात 48 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अतिदक्षता विभागातील 12 रुग्णांचा तर इतर विभागातील सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, विविध मंत्री आणि लोकप्रतिनिधी हे वेगवेगळी आकडेवारी देत आहेत. तर 48 तासात 18 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी अधिकृत माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यानी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांना घटनेची दिली माहिती - गेल्या 48 तासांत 18 मृत्यूची नोंद झाली आहे. मृत रुग्णांवर आधीच मूत्रपिंडाचा आजार, न्यूमोनिया, विषबाधा, रस्ता अपघात आणि इतर कारणांसह विविध आजारांवर उपचार सुरू होते. या मृत्यूंबाबत मी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. या घटनेच्या निःपक्षपाती चौकशीसाठी एक समिती स्थापन केली जाईल, जेणेकरुन रुग्णांना योग्य उपचार मिळाले की नाही हे शोधून काढले जाईल, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.

ठाणे शहरातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या २४ तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या डीनला दोन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे - आरोग्य मंत्री तानाजी सावंत

रुग्णालय प्रशासनाची प्रतिक्रिया -रुग्णालय प्रशासनातील प्रचंड अनागोंदी, डॉक्टरांचे अपुरे मनुष्यबळ क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. अशातच एकाच रात्री 17 जणांनी आयुष्य गमाविले आहे. रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला आहे. काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने व काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. मात्र सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे.

48 तासात एकूण 18 रुग्ण दगावले आहेत. यात पुरुष 8, महिला 10 आहेत. याप्रकरणाची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. आरोग्य सेवा आयुक्तांमार्फत चौकशी गठित करण्यात आली आहे. चौकशीत ठाणे जिल्हाधिकारी, ठाणें पालिका आयुक्त, संचालक आरोग्य सेवा. जे.जे. रूग्णालय नामांकित डॉक्टरमार्फत चौकशी करण्यात येईल - अभिजीत बांगर, ठाणे पालिका आयुक्त

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातला प्रकार -याच रुग्णालयात १० ऑगस्टला एकच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते. या रुग्णालयात रात्री 10.30 पासून सकाळी 8.30 पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात ठाणे महानगरपालिका आहे. त्यात असलेली वर्षानुवर्षे सत्तादेखील आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमधील मृत्यूने शिवसेनेची ( शिंदे गट) चिंता वाढली आहे.

मृतांची नावे पुढीलप्रमाणे - १. गीता (अनोळखी) २. झायदा शेख (६० वर्ष) ३. सुनीता इंदुलकर (७० वर्ष) ४. ताराबाई हरी गगे (५६ वर्ष) ५. भानुमती पाढी (८३ वर्ष) ६. सनदी सबिरा मोहम्मद हुसेन (६६ वर्ष) ७.निनाद रमेश लोकूर (५२ वर्ष) ८.भास्कर भिमराव चाबूस्वार (३३ वर्ष) ९.अमरिन अब्दुल कलाम अन्सारी (३३ वर्ष) १०. अशोक जयस्वाल (५३ वर्ष) ११. भगवान दामू पोतदार (६५ वर्ष) १२. अब्दुल रहीम खान (५८ वर्ष) १३. सुनील तुकाराम पाटील (५५ वर्ष ) १४. ललिताबाई शंकर चव्हाण (४२ वर्ष) १५. चेतक सुनील गोडे (४ वर्ष) १६. अशोक बाळकृष्ण निचाल (८१ वर्ष) १७. नूरजहाँ खान (६० वर्ष) १८. कल्पना जयराम हुमाने (६५ वर्ष)

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 18 रुग्ण दगावले. अतिशय वाईट बातमी आहे. पण याची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा 2 दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतले असते तर आज हे घडले नसते. आज टीव्हीसमोर पुढे येऊन काहीजण त्यांची बाजू घेताना दिसत आहेत हे दुर्देव आहे. जे गेले त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल? याची जराही भिती, खंत हॉस्पिटलची बाजू घेणाऱ्यांच्या मनात दिसत नाही. प्रशासनाला याचा जाब विचारायलाच पाहिजे. तसेच या 17 जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी. या संपूर्ण प्रकरणाची तसेच हॉस्पिटलने संपूर्ण हॉस्पिटलचे ऑडिट करून जाहीर करावे - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी

ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केली होती निलंबनाची कारवाई-कळवा रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची पाहणी केल्यानंतर काही महिन्यापूर्वी या रुग्णालयाच्या डीनवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती. मात्र मागील काही दिवसांपासून सिविल रुग्णालय शिफ्ट झाल्यामुळे आणि कळवा रुग्णालयात रुग्णांचा ओढा वाढल्यामुळे प्रशासनावर ताण पडलेला आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपर स्पेशलिटी कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन ठाण्यात केले होते. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. मात्र हे करत असताना सर्वात जुने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दुर्लक्षित झाले आहे का असा प्रश्न निर्माण होतोय.

हेही वाचा -

chhatrapati Shivaji Maharaj Hospital : मृत व्यक्तीवर आयसीयूत डॉक्टरांकडून 5 तास उपचार-जितेंद्र आव्हाड यांचा दावा

Last Updated : Aug 13, 2023, 10:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details