ठाणे- शासकीय सेवेत नोकरीला असताना पद व अधिकाराचा गैरवापर करून अपसंपदा गोळा करणाऱ्या तीन लोकसेवक आणि त्यांचे नातेवाईक अशा आठ जणांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पोलीस अधिकारी, तत्कालीन जिल्हा परिषद अधिकारी, तत्कालीन उपकर निधारक व संकलक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
अपसंपदेप्रकरणी तिघा अधिकाऱ्यांसह नातेवाईंकावर गुन्हे दाखल - Anti-Corruption Division
शासकीय सेवेत नोकरीला असताना पद व अधिकाराचा गैरवापर करून उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा गोळा करणाऱ्या तीन लोकसेवक व त्यांच्या नातेवाईकांविरोधात, शनिवारी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल केले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी धोडींराम जाधव (५९) यांनी पोलीस दलात असताना, उत्पन्नापेक्षा ४७ टक्के म्हणजेच ४१ लाख ६५ हजार ०६७ रुपयांपेक्षा जास्त अपसंपदा संपादित केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचबरोबर तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय एकनाथ बाविस्कर यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या १३ लाख ५२ हजार ०७३ इतकी म्हणजेच ४५.४६ टक्के अपसंपदा संपादित केली. सदर मालमत्ता ही गैरमार्गाने कमविल्या गेली होती. अपसंपदेचा विनियोग करण्यासाठी त्यांची पत्नी शर्मिला बाविस्कर, सदाशिव सतीश वैद्य, एकनाथ बाविस्कर आणि ताराचंद्र श्रवण वाघ अशा पाच जणांविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे तत्कालीन उपकर निधारक व संकलक अधिकारी सुनील बळीराम बने (६०) यांनी परिक्षण कालावधीत उत्पन्नापेक्षा ३३ लाख ०२ हजार ५८२ इतकी म्हणजे ३०.३८ टक्के जास्त अपसंपदा संपादीत केली. यात त्यांना त्यांच्या पत्नीने मदत केली म्हणून दोघांविरोधातही राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.