ठाणे :मुख्यमंत्र्याच्या जिल्हयातील ४२ ग्रामपंचात निवडणुकीतील प्रचाराची ( Gram Panchayat Election ) रणधुमाळी सुरु झाली. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात ठाणे जिल्हातील १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालात शिंदे गटाने ( Chief Minister Eknath Shinde ) सर्वाधिक ४२ ग्रामपंचायतवर झेंडा फडकवला, तर ठाकरे गटाने ४० ग्रामपंचायतवर कब्जा मिळविण्यात यश आले होते. आता पुन्हा ग्रामीण भागात निवडणुकीचा धुराळा उडाला असून ठाकरे, शिंदे गटात चुरस ( Direct fight in the Thackeray Shinde group ) निर्माण झाल्याचे पाहवयास मिळत आहे.
४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार -ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचात निवडणुकीत भिवंडी तालुक्यात १४ , मुरबाड तालुक्यात १४ तर कल्याण तालुक्यातील ९ तसेच शहापूर तालुक्यातील ५ अश्या ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यापैकी सर्वाधिक भिवंडी आणि मुरबाड तालुक्यात १४ - १४ ग्रामपंचायत निवडणुका असून भिवंडी ग्रामीण मधून शिंदे गटाचे आमदार तर मुरबाड तालुक्यात भाजपचे आमदार आहे.
४२ उमेदवार रिंगणात -भिवंडी तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतर थेट 13 सरपंच निवडीच्या निवडणुकीत सर्वाधिक ४२ उमेदवार रिंगणात आहे. शिंदे गटाचे भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांनी आपल्या मूळ गाव असलेल्या खानीवली ग्रामपंचायतीतील सरपंच पदासह सातही सदस्य बिनविरोध निवडल्याने गावावर आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. मात्र भिवंडीतील कोनगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपामध्ये बंडखोरी झाल्याने इतर ठिकाणीही त्याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.
डॉ. रुपाली कराळे ह्या सरपंच पदासाठी मैदानात -कोनमधून पुन्हा डॉ. रुपाली कराळे ह्या सरपंच पदासाठी मैदानात उतरल्या आहे. मात्र भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी रेखा पाटील या नवख्या उमेदवाराला मैदानात आणल्याने त्याचा फायदा ठाकरे गटाला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर कशेळी गावावर शिंदे गटाचे देवानंद थळे यांच्या ताब्यात १५ वर्षांपासून असलेली ग्रामपंचायत पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेण्यासाठी सरपंच पदासाठी विद्यमान सरपंच असलेल्या पत्नी वैशाली देवानंद थळे या पुन्हा रिंगणात उतरल्या आहेत.
मुरबाड तालुक्यात भाजपचे आमदार किसन कथोरे यांचे वर्चस्व-मुरबाड तालुक्यात भाजपचे आमदार किसन कथोरे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात असून १४ ग्रामपंचयती निवडणुकीतील ३ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध आले. त्यामुळे मुरबाड मधील ११ ग्रामपंचयात निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे - ठाकरे गटसह राष्ट्रवादीमध्ये लढत होणार आहे. विशेष म्हणजे थेट सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात ३९ उमेदवार आपले नशीब अजमावत आहे.
शिंदे - भाजप सज्ज -कल्याण तालुक्यात ९ ग्रामपंचायत निवडणुकीपैकी १ बिनविरोध झाल्याने उर्वरित ८ जागेसाठी २६ सरपंच पदाचे उमेदवार मैदानात आहे. या तालुक्यात ठाकरे गटाचे वर्चस्व असून त्यांना टक्कर देण्यासाठी शिंदे - भाजप सज्ज असल्याचे दिसून आले. तर शहापूर मध्ये ५ ग्रामपंचायत निवडणुकीपैकी १ ठिकाणी बिनवरोध झाली आहे. तर उर्वरित ४ ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ७ उमेदवार रिंगणात आहे. या तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा असूनही शिंदे गटाने प्रचारात बाजी मारून निवडणुकीत रंगत आणली आहे.
६ ठिकाणी बिनविरोध सरपंच -जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायत निवडणुकी पैकी ६ ठिकाणी सरपंच पदाचे बिनविरोध निवडून आल्याने ३६ ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या जागेसाठी ११४ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. तर जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतमधील ३६० सदस्य पदासाठी ६१३ उमेदवार विविध गावपातळीवरील पॅनलची उमेदवारी मिळवून मैदानात उतरले आहे. १८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच पर्यत मतदान होणार आहे. तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार असून मतदारराजा कोणाच्या पारड्यात मताचे दान टाकेल हे २० डिसेंबर रोजी समोर येणार आहे.