ठाणे- प्रवाशांची ओळख वाढवून गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या बंटी-बबली जोडीला कल्याण लोहमार्ग (गुन्हे शाखा) पोलिसांनी गजाआड केले आहे. सरला सदानशिव उर्फ सरला एंळजे (वय ३०), नदीम आले मोहम्मद सय्यद उर्फ अब्बास, अशी भामट्या बंटी-बबलीची नावे आहेत. या दोघांनी यापूर्वी, अशा प्रकारे किती रेल्वे प्रवाशांना लुबाडले, याचा तपास कल्याण रेल्वे पोलिसांनी सुरू केला आहे.
गुंगीचे औषध देऊन रेल्वे प्रवाशांना लुटणारी बंटी-बबली गजाआड - बंटी-बबली
सरला सदानशिव उर्फ सरला एंळजे (वय ३०), नदीम आले मोहम्मद सय्यद उर्फ अब्बास अशी भामट्या बंटी-बबली जोडीची नावे आहेत.
कल्याण रेल्वे स्थानकात लोकलची वाट पाहत बाकड्यावर बसलेल्या एका प्रवाशाला महिलेने हटकले. कुठे जायचे आहे, काय काम करता असे प्रश्न करत बोलण्यात गुंतवले. ओळख वाढवून त्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचा मोबाईल नंबर घेतला. दुसऱ्या दिवशी पुन्हा या आरोपी महिलेने फोन करत त्या व्यक्तीला कल्याण रेल्वे स्थानकावर बोलावून घेतले. त्यावेळी आरोपी सरलाने त्या प्रवाशाला बोलण्यात गुंतवून गुंगीचे औषध असलेले क्रिम बिस्कीट खाण्यास दिले. हे बिस्कीट खाल्ल्यानंतर प्रवाशाला गुंगी आल्याने आरोपी महिलेने तुम्हाला घरी सोडते, असे सांगत त्यांना कोपर रेल्वे स्थानकावर घेऊन आली. तिथे आपल्या एका साथीदाराच्या मदतीने या प्रवाशाजवळील एटीएम कार्ड, मोबाईल फोन, रोख रक्कम, सोन्याचे दागिने काढून घेत तेथून पसार झाले. त्यानंतर या एटीएम कार्डच्या सहाय्याने मुंब्रा येथे एका एटीएममधून रोकड काढली. त्यानंतर मोबाईलच्या दुकानातून एक मोबाईल व ज्वेलर्सच्या दुकानातून मंगळसूत्र खरेदी केले.
या बंटी-बबलीच्या जोडीने एकूण १ लाख २१ हजार ५३८ रुपयांचा ऐवज लुबाडला आहे. या प्रकरणी २२ एप्रिल रोजी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासादरम्यान फलाटावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी महिलेचा व तीच्या साथीदाराचा सुगावा लागला. पोलिसांनी सरला व तिचा साथीदार नदीम आले मोहम्मद सय्यद उर्फ अब्बास याला दिवा येथून अटक केली. या दोघांना न्यायालायत हजर केला असता न्यायालयाने त्यांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपींकडून ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.