ठाणे -आदिवासी वसतिगृहातील अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा वसतिगृहालगत जंगलातील एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मुरबाड शहरानजीक असलेल्या आदिवासी वसतिगृहाच्या लगत असलेल्या जंगलात घडली. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये आत्महत्येचा फोटो अपलोड केला असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करून या विद्यार्थ्याची हत्या की आत्महत्या याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. बंदु रामा निरगुडा, असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो मुरबाडमधील देवरालवाडी येथील राहणारा होता.
अकरावीच्या विद्यार्थ्याचा झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, हत्या की आत्महत्या? - ठाणे पोलीस बातमी
ठाण्यातील आदिवासी वसतिगृहातील अकरावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा वसतिगृहालगतच्या जंगलात झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या प्रकरणी हत्या की आत्महत्या याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
मृत बंदु रामा निरगुडा हा मुरबाड शहरातील न्यू इंग्लिश स्कूलमधे अकरावीचे शिक्षण घेऊन तो मुरबाडमधील एका आदिवासी वसतिगृहात राहत होता. सकाळच्या सुमाराला वसतिगृहालगत असलेल्या जंगलातील एका झाडाला त्याचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृत विद्यार्थ्याच्या मोबाईलमधील व्हॉटसअप स्टेटसवर त्याचा आत्महत्येचा फोटो अपलोड केल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. यामुळे मृत बंदु यांच्या नातेवाईकांनी बंदुची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही आत्महत्या की हत्या याचा तपास मुरबाड पोलीसांकडून सुरू करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे आदिवासी वसतिगृहात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुरबाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर बंदुचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी मुरबाडमधील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्याच्या मृतदेहाच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर खरे कारण समजू शकणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.