ठाणे :खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार राबविल्या जाणाऱ्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी ठाण्यातील आनंदनगर चेकनाका इथून सुरूवात करण्यात आली. चार दिवस चालणाऱ्या या जनआशीर्वाद यात्रेत भाजपचे नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहे. या यात्रेदरम्यान नागरिकांसोबत संवाद साधून विविध योजनांचा आढावा घेतला जाणार आहे.
भाजपच्या ठाण्यातील जनआशीर्वाद यात्रेला आनंदनगरमधून सुरूवात कपिल पाटील यांच्या नेतृत्वात यात्रा
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वातील ही यात्रा संपूर्ण ठाणे शहरातून जाणार आहे. आनंदनगर चेकनाका येथून यात्रेला सुरूवात झाली आहे. यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रेसाठी एक एक खास रथ तयार करण्यात आला आहे.
नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून यात्रा
देशाचा कारभार लोकाभिमुख आणि पारदर्शक असावा या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून राज्यात भाजपतर्फे जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात करण्यात आली आहे. या जनआशीर्वाद यात्रेची महाराष्ट्राची जबाबदारी भाजपकडून आमदार संजय केळकर यांच्याकडे देण्यात आली आहे. सोमवारपासून सुरू होणारी ही यात्रा २० ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या यात्रेत भाजपचे जिल्हास्तरीय आणि स्थानिक पातळीवरील नेतेही सहभागी होणार आहेत. या यात्रेदम्यान भाजपचे नेते सामान्य नागरीक व ग्रामस्थांशी संवाद साधून विविध योजनांचा आढावा घेणार आहेत.
नागरिकांशी साधणार संवाद
शेतकरी, भूमिपुत्र, मच्छिमार, दिव्यांग व लाभार्थी, व्यावसायिक व व्यापारी यांच्याशी संवाद तसेच भाजपचे समर्थ बूथ अभियान, स्वच्छता अभियान आदी विविध कार्यक्रम या यात्रेच्या निमित्ताने होणार आहेत. या यात्रेची जय्यत तयारी झाली असून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. जास्तीत जास्त समाजघटकांना या यात्रेत जोडून घेत नागरीक व ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रयत्न यात्रेद्वारे केला जाणार आहे.
हेही वाचा -फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली द्यायची- शिवसेना