वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्वागतावेळी शिवसेना ठाकरे गटात जुगलबंदी ठाणे :कोकणवासियांसाठी वरदान ठरणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षात आणले आहे. गोवा ते मुंबई पहिली वंदे भारत एक्सप्रेस मंगळवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानकावर येताच भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ठाणे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवून एक्सप्रेसचे स्वागत केले. तसेच वंदे भारत एक्स्प्रेसवर पुष्पवर्षाव करून डावखरे आणि उध्दव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी मोटरमन यांच्यासह उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
एकोप्याचे दर्शन :यावेळी रेल्वे स्थानकावर भाजपचे संजय वाघुले, नारायण पवार, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, विक्रम भोईर, राजेश मढवी, कृष्णा भुजबळ आदी उपस्थित होते. दरम्यान याच वेळी शिवसेना ठाकरे गटाचे खाजदार राजन विचारे यांनीही नरेश मणेरा, मधुकर देशमुख आदी कार्यकर्त्यासह ठाणे स्थानकात येऊन वंदे भारत एक्सप्रेसच्या घोषणा देत स्वागत केले. यावेळी भाजप-ठाकरे-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणांची जुगलबंदी चांगलीच रंगली होती. मात्र, वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करताना या पक्षातील नेत्यांनी एकोप्याचे दर्शन घडवल्याचे पाहायला मिळाले.
दोन्ही गट पहिल्यांदा आले आमने सामने :या दोन्ही पक्षांचे गट समोरासमोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू झाली. भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा सुरू केल्या, तर उद्धव ठाकरे गटाने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. दरम्यान या प्रकाराने वातावरण बिघडत असल्याचे लक्षात आल्यावर रेल्वे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडू नये यासाठी पोलिसांनी विशेष काळजी घेतली होती. आजच्या या प्रकारानंतर ठाण्यात भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे गट पहिल्यांदाच आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.
धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस सुरु करा : ठाणे रेल्वे स्थानकातून धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस सुरु करा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांना गर्दीचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत असतात. ते कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केलेल्या मागणीनुसार खासदार राजन विचारे यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहले. ठाणे वासियांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे हे श्रद्धास्थान असल्याने गणेशोत्सवासाठी (अनारक्षित) धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस ठाण्यातून सुरू करावी अशी मागणी विचारे यांनी केली आहे. या पत्रात त्यांनी असेही म्हटले आहे कि, सन २६ जानेवारी १९९८ रोजी प्राध्यापक मधु दंडवते यांच्या प्रयत्नाने भारतीय रेल्वेतील कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते बेंगलोर अशी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, दिवा, पनवेल या स्थानकातून दैनंदिन कोकण रेल्वे सेवा सुरु करण्यात आल्या. कोकण वासियांसाठी यापूर्वी होणारा एसटीचा प्रवास कमी होऊन कालांतराने रेल्वेने प्रवास अधिक वाढू लागला.
रेल्वे प्रवाशी संखेत वाढ : तसेच पर्यटकांची गर्दी कोकणात अधिक वाढू लागल्याने कोकणवासीयांना जागा आरक्षित मिळत नाही. याचा विचार करून खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर या शहरात कोकणवासियांची संख्या अधिक आहे. ठाणे शहर केंद्रबिंदू असल्याने ठाणे रेल्वे स्थानकातून ही रेल्वे सेवा गणेश उत्सवाच्या तीन दिवस आधी सरु करण्याची विचारे यांची मागणी आहे. १६ सप्टेंबर २०२३ पासून विसर्जनाच्या तीन दिवसानंतर म्हणजे १ ऑक्टोबर २०२३ रोजी ठाणे ते थिविम, थिविम ते ठाणे अशी अनारक्षित धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस ठाणे रेल्वे स्थानकातून सुरू करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
हेही वाचा -Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना, लोको पायलटसोबत ईटीव्ही भारतने साधला संवाद