ठाणे- खासदार असदुद्दीन ओवैसींच्या जाहीर सभेला भाजपचा विरोध असून आपण ओवैसींची जाहीर सभा उधळून लावू, असा निर्धार भाजप नेत्यांनी केला होता. मात्र, सभेचा घटनाक्रम पाहता खासदार ओवैसींच्या भिवंडीतील सभेवरून भाजपच्या नेत्याने 'यू टर्न' घेत, पुढील होणाऱ्या सभेला भाजपच्या शुभेच्छा असल्याचे जाहीर करत ओवैसींच्या सभेच्या वादावर पडदा टाकला आहे.
विशेष म्हणजे जाहीर सभेला भाजपचा विरोध असून आपण ओवैसींची भिवंडीतील जाहीर सभा उधळून लावू, असा निर्धार भाजप जिल्हा अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी केला होता. तर भाजपच्या बदललेल्या भूमिकेनंतर एमआयएमचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांनीही खासदार ओवैसींची सभा होणारच, कुणाच्या बापात दम असेल त्यांनी ओवैसींची सभा रोखून दाखवावी, असे प्रतिआव्हान भाजपला केले होते. त्यामुळे एमआयएमच्या प्रतिआव्हानमुळे भिवंडीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.