ठाणे- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा दिलेला शब्द, अवकाळी पावसाच्या नुकसानीबाबत २५ हजार रुपये देण्याचे आश्वासन, जी दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली तीही मार्चमध्ये होणार आहे, असे राज्यसरकारचे काम चालू आहे. त्याचप्रमाणे १० रुपयांची थाळी म्हणजे बोलाचीच कडी बोलाचाच भात असल्याचा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी ठाण्यात केला.
माहिती देताना भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा या विषयावर भाजपकडून जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून खोपट येथील मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत पक्षाची भूमिका मांडली. नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात गैरसमज पसरवण्याचे काम काँग्रेससह इतर विरोधी पक्ष करत आहेत. पतपेटीच्या राजकारणासाठी काँग्रेसचे राजकारण सुरू असून याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला असल्याचा गंभीर आरोप उपाध्ये यांनी यावेळी केला.
पाकिस्तान, बांगलादेश येथील अल्पसंख्यांकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. २००७ साली राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तेव्हाचे गृहमंत्री चिदंबरम याना पत्र लिहून आपल्या राज्यात निर्वासितांचा प्रश्न उग्र होत असल्याचे कळवले होते. आणि तेव्हा १४ हजार नागरिकांना नागरिकत्व बहाल करण्यात आले होते. ही निरंतर प्रक्रिया सुरू रहाणार असून इतर देशातील नागरिकांना नियमाप्रमाणे नागरिकत्वासाठी अर्ज करता येणार आहे. जे आरोप करण्यात येत आहेत त्यात घटनेच्या १४ व्या कलमाचा भंग होत असल्याचे सांगण्यात येत आहेत. मात्र, हे चुकीचे असून सर्व धर्मांना समान अधिकार आहेत. मात्र, असमानांना समान वाटप केल्यास अन्याय होणार आहे याचाही विचार व्हायला हवा. या कायद्याच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर उतरले असून लोकसभेत शिवसेनेने जी भूमिका घेतली तीच ते कायम ठेवतील, असा आशावादही केशव उपाध्ये यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, सोशल मीडियावर मत व्यक्त करणाऱ्या एका युवकाला शिवसैनिकांनी मारहाण केली त्यावर विचारले असता यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्याला जेव्हा विरोध झाला तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा आरोळ्या ठोकण्यात आल्या. मात्र, आता ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते कुठल्या बिळात लपून बसले आहेत, असा प्रश्न उपाध्ये यांनी विचारला. तर अमृता फडणवीस या कर्तृत्ववान असून त्यांना त्यांची मते मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही केशव उपाध्ये यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा-गुरुवारी दिसणार या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण