ठाणे -अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ठाकरे सरकार दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अभिनेत्री कंगना रणौतचे 'ते' बोलणे चुकीचे आहे, असे मत भाजपा नेते किरीट सोमैया यांनी व्यक्त करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. कंगनाने एका ट्विटमध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (पीओके) केली होती. यावरुन वाद सुरू आहे.
'कंगना चुकली; मात्र, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण ठाकरे सरकार दडपण्याच्या प्रयत्नात' कल्याण पश्चिममधील शंकरराव झुंझारराव चौकातील श्री. स्वामी नारायण हॉलमध्ये आज (रविवारी) कोरोना समुपदेशन समिती व रक्तनंदा ग्रुप, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी प्लाझ्मा शिबिरासह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सोमैया हे रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाला कल्याणात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सुशांतसिंह आणि कंगना वरून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या राजकारणावर मत मांडले.
किरीट सोमैया पुढे म्हणाले, कोविडमुळे मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरांची परिस्थिती भयानक झाली आहे. मात्र, ठाकरे सरकार यामध्ये मार्ग न काढता हा विषय टाळून वेगवेगळे निमित्त पुढे करुन नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. सुशांतसिंहच्या प्रकरणात जी चौकशी सीबीआय, ईडी, एनडीसी करीत आहे, यामुळे मला आनंद झाला आहे. कारण, सुशांत आत्महत्या प्रकरणाचा एक-एक टप्पा पार करीत आहेत. त्यामुळे सुशांतच्या परिवाराला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर ठाकरे सरकार हे प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
तर कंगनाच्या विषयी मात्र सौमेया म्हणाले, विषय भरकटवू नका. कंगनाने मुंबईचा अपमान केला ते चुकीचे आहे. त्यामुळे पुन्हा मूळ विषय भरकटत असल्याची टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.