ठाणे -भाईंदर पूर्वेच्या अदानी कंपनीच्या कार्यालयाबाहेर भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार अद्यापही झोपले आहे. वाढीव वीजबिलाबाबत ठोस निर्णय घ्यावा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाजपा कार्यकर्त्यांनी दिला.
अदानी कार्यालयाबाहेर भाजपाचे आंदोलन; वीजबिलाची होळी
आज मीरा भाईंदरमधील अदानी कंपनीच्या कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वीजबिलाची होळी केली.
राज्यातील वीज बिलासंदर्भात विरोधी पक्ष आक्रमक पावित्र्यात असताना भाजपाने राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. त्यातच आज मीरा भाईंदरमधील अदानी कंपनीच्या कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वीजबिलांची होळी केली. वीजबिलाबाबत ठोस निर्णय कधी घेणार, असा प्रश्न आंदोलकांनी केला. जनतेला हे सरकार वेठीस धरत आहे हे योग्य नसून वीज बिलात सूट द्यावी, अन्यथा जनता काही दिवसात रस्त्यावर उतरून आक्रोश करेल, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.
भाईंदर पूर्वेच्या अदानी कंपनीच्या बाहेर रस्त्यावर मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मीरा भाईंदर शहर भाजपाच्या महापौर जोस्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, सभागृह नेते प्रशांत दळवी, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, शानू गोहिल,अनिल भोसले, विनोद म्हात्रे, सुरेश खंडेलवाल, हेतल परमार तसेच भाजपा प्रवक्ते रणवीर वाजपेयींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.