मीरा भाईंदर (ठाणे) -मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात बांधण्यात येणाऱ्या दिवंगत प्रमोद महाजन कलादालनाचे भूमिपूजन व अग्निमशन विभागाच्या ताफ्यात येणार्या अद्ययावत टर्न टेबल लॅडर (टीटीएल) या वाहनाचे लोकार्पण, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी बीएसयूपी प्रकल्पातील बाधित लाभार्थ्यांना गाळ्याचे वितरणही त्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिवंगत प्रमोद महाजन सभागृहसाठी 40 कोटी खर्च
यावेळी महापौर हसनाळे म्हणाल्या, प्रमोद महाजन कलादालनाच्या बांधकामासाठी सुमारे 40 कोटी इतका खर्च येणार असून या आर्थिक व प्रशासनिक खर्चास महासभेने मंजूरी दिली आहे.
अग्निशमन दलात एक टर्न टेबल लॅडर
मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून नवनव्या टोलेजंग इमारती येथे उभारत आहेत. या शहरातील नागरिकांना उत्तम व अद्ययावत अग्निशमन सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी अग्निशमन विभागाच्या ताफ्यात 68 मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर (टीटीएल) हे वाहन शामिल करण्यात आले आहे. या वाहनामध्ये उद्वाहक (लिफ्ट)ची सोय देखील करण्यात आली असून अशा प्रकारचे वाहन खरेदी करणारी मीरा-भाईंदर महानगरपालिका ही राज्यातील पहिलीच महापालिका ठरली आहे, असेही त्यांनी सांगितले.