ठाणे : बांगलादेशातून छुप्या मार्गाने येवून भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशी तरुणांना, नारपोली पोलिसांनी भिवंडी शहरातील दापोडा येथील पारसनाथ कंपाउंडमध्ये सापळा रचून त्यांना अटक केली आहे. मोहम्मद जियाउल हक (२९), अबु सुफियान कबीर शेख (२२), अबू मोसा कबीर शेख (१९), मोहमद अफसर शेख(२६) असे गजाआड करण्यात आलेल्या तरूणांची नावे आहेत. गेल्या दोन वर्षात 25 हुन अधिक बांगलादेशी नागरिकांची पोलिसांनी धरपकड केली आहे. हे चारही बांगलादेशी तरुण गेली अनेक वर्षांपासून भिवंडीत वास्तव्यास होते.
तरुणांना न्यायायालयात हजर केले: अटक केलेल्या चारही बांगलादेशी तरुणांकडे भारताचा अधिकृत पारपत्र किंवा भारत देश किंवा बांगलादेशाचा विजा नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने छुप्या मार्गाने दलालाच्या मदतीने बांगलादेशातून भिवंडीत येवून अनधिकृतपणे वास्तव्यास राहत असल्याची प्रथम दर्शनी तपासात आढळून आले आहे. शिवाय अटक बांगलादेशी तरुणाकडे आधारकार्ड, पॅन कार्ड बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, नारपोली पोलिस ठाण्यात पासपोर्ट नियम १९५० चे कलम ३ (अ), ६ (अ) आणि फॉरेनर्स ऍक्ट १९४६ चे कलम १४(अ), अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. चारही अटक बांगलादेशी तरुणांना न्यायायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार करीत आहेत.
पोलिसाची हत्या करून मृतदेह पुरला खड्यात:उसनवारीने दिलेले पैसे परत मागण्याचा तगादा लावणाऱ्या रिटायर पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करून, त्यांचा मृतदेह मुरबाड नजीकच्या जंगलातील खड्यात पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुरबाड तालुक्यातील देवघर धरण गावा नजीकच्या जंगलात घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात हत्यासह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. महादू वाळकोळी आणि लक्ष्मण गोटीराम जाधव असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. तर अशोक मोहीते असे हत्या झालेल्या रिटायर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मृतदेह खड्यात पुरला: पोलिसांनी चक्र फिरवत महादू वाळकोळीला मुरबाड तालुक्यातील दुधनोली गावातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी पोलिसांनी केली असता मृतक मोहिते हे त्यांनी उधार दिलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावत असल्याने वाळकोळी याने दुसरा आरोपी लक्ष्मण गोटीराम जाधव याच्या मदतीने मृतक अशोक मोहिते यांना बहाण्याने मुरबाड तालुक्यातील देवघर धरण परिसरात नेवून त्यांची हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह खडयात पुरला होता, अशी कबुली आरोपी महादू याने पोलिसांनी दिली.
प्रेत पुरले असल्याची दिली कबुली: दिलेल्या कबुलीनुसार आरोपीच्या सांगण्याप्रमाणे शोध घेतला असता देवघर धरण परिसरातील झाडाझुडपांमध्ये दलदलीच्या जागेत जमीनीमध्ये पुरुन ठेवलेला अशोक माहिते यांचा मृतदेह मिळून आला. त्यावरुन गुन्ह्यामध्ये कलम १२०ब, ३०२, २०१, ३४ भादंवि या कलमांची वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महादू वाळकोळी आणि त्याचा साथीदार लक्ष्मण जाधव यांना गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासांच्या आत अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.