ठाणे Badlapur Car Driver Robbed : अंत्ययात्रेला जाण्याच्या बहाण्यानं ओला कार बुक करून निर्जनस्थळी नेत चालकाला मारहाण करत लुटून त्याची ओला कार पळवल्याची घटना समोर आलीय. ही घटना बदलापूर पश्चिम भागातील निर्जनस्थळ असलेल्या उल्हासनदी जवळ घडलीय. याप्रकरणी ओला चालकाच्या तक्रारीवरून ६ भामट्या प्रवाशांवर विविध कलमानुसार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी भामट्यांच शोध सुरू केलाय.
मारहाण करत चालकाला लुटले : याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अब्दुल सईद राईन (वय ३८) हे नालासोपारा पूर्व भागातील पेल्हार परिसरात कुटूंबासह राहतात. ते ओला कार चालक असून २७ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बदलापूर पश्चिम भागातील एका पेट्रोलपंपावर कारसह उभे होते. एका अनोखळी मोबाईल नंबरवरून इच्छित स्थळी जाण्यासाठी भामट्यानं ओला बुक केली. त्यानंतर चालक त्या भामट्याच्या मोबाईल लोकेशनवर पोहोचले. मात्र, त्या भामट्यासोबत त्याचे इतर पाच साथीदारही त्याठिकाणी हजर होते. त्यानंतर आम्हाला लवकर अंतयात्रेला जायचं असा बहाणा करत हे सहा भामटे ओला कारमध्ये बसले. ओला कार काही वेळानं बदलापूर पश्चिम भागातील निर्जनस्थळ असलेल्या उल्हासनदी जवळील रस्त्यावर येताच कारमध्ये बसलेल्या भामट्यांनी चालक अब्दुलला लोखंडी रॉडने मारहाण करत धमकी देऊन त्याच्या जवळील रोख रक्कम आणि दोन मोबाईल तसेच त्याची ओला कार असा ८ लाख ११ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमाल घेऊन पळून गेले.