ठाणे :आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या नावाने बनावट फेसबुक, व्हॉट्सअप अकाउंट तयार केले. या बनावट अकाउंटद्वारे पैशांची मागणी केली जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसद्वारे दिली आहे. तसेच त्यांनी कोणीही याला बळी पडू नये, असे आवाहन शहरातील नागरिकांना केले आहे. आयुक्तांनी बनावट अकाउंट बनवणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात सायबर क्राईममध्ये तक्रार देखील केली आहे.
आयुक्त म्हसाळ पुन्हा पदावर :आयुक्त विजयकुमार म्हसाळ भिवंडी महापालिकेचा पदभार गेल्या एक वर्षांपासून सांभाळत असून ते भिवंडी - निजामपूर महापालिकेत कार्यरत आहेत. मात्र, नुकतीच त्यांची शासनामार्फत तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी पालिका आयुक्त म्हणून अजय वैद्य यांची नियुक्ती राज्य शासनाकडून करण्यात आली होती. याविरोधात आयुक्त म्हसाळ यांनी कॅगमध्ये न्याय मागितला असता कॅगचा निर्णय आयुक्त म्हसाळ यांच्या बाजूने दिला. या घटनेला तीन दिवस उलटून होत नाही तोच आयुक्त म्हसाळ यांच्या नावाने बनावट फेसबुक, व्हॉट्सअप अकाउंट उघडण्यात आले आहे. या घटनेमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. आयुक्तांनी त्यांच्या व्हाट्स अप स्टेटसला ठेवलेल्या संदेशावरून हे प्रकरण समोर आले आहे. तर याप्रकरणी आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी अज्ञात व्यक्तीच्या संदेशांना बळी न पडता नागरिकांनी सर्तक राहण्याचे अवाहन केले आहे.