ठाणे - कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी गावात ये-जा करणाऱ्या एका कोरोना योद्धावर बहिष्कार न टाकणाऱ्या कुटूंबावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील कसारा नजीक असलेल्या मोखावणे गावात घडली आहे. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील 32 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील मोखावणे गावातील एक कर्मचारी मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयात कार्यरत आहे. हा कर्मचारी रोज कामावरून घरी ये-जा करत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यासोबत फिरु नका. त्याच्यावर बहिष्कार टाका, तुमच्यामुळे गावात कोरोना येईल, असे किरण वेखंडे यांना गावातील भोईर गटातील काही जण वारंवार सांगत होते. मात्र, किरण व तो कर्मचारी मित्र असल्याने ते दोघे एकमेकांच्या घरी जात होते. याचा राग मनात ठेवून किरण वेखंडे व त्याच्या कुटुंबावर तलवार, लाठी काठ्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनतर वेखंडे आणि भोईर या दोन कुटुंबाच्या गटात जोरदार हाणामारी झाली.