ठाणे - कोरोना व्हायरसने भारतात थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक मजूर त्या-त्या राज्यात, जिल्ह्यात अडकले आहेत. हातचे काम गेल्याने मजुरांनी घराचा रस्ता पकडला आहे. अशाच प्रकारे गावाकडे जाणाऱ्या भुकेल्या मजुरांना मुरबाड तालुक्यातील देवपे गावात जेवण देण्यात आले.
उपाशी पोटी गावाकडे निघालेल्या मजुरांना दिले जेवण हेही वाचा-केईम रुग्णालयातील 'त्या' व्हायरल व्हिडिओचा अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मागवला
कोरोनाच्या भीतीने ठिकठिकाणी अडकलेले मजूर मिळेल त्या वाटेने आपले गाव शोधीत निघाले आहेत. ६० मजुरांचा तांडा मुरबाड पंचायत समिती गट नेते श्रीकांत धुमाळ यांच्या नजरेस पडला. त्यांनी मजुरांची विचारपूस केली. त्यावेळी मजूर उपाशीच असल्याचे समजले. धुमाळ यांनी सहकारी तुषार कथोरे व मित्रमंडळीला याची कल्पना दिली.
गावात स्थलांतरीतांना प्रवेश देऊन त्यांची जेवणाची सोय करण्याचा या मंडळीने विचार केला. मात्र, वाद व जोखीम नको म्हणून शक्कल लढवत सर्व स्थलांतरितांना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गावच्या स्मशानात आसरा दिला. तत्काळ स्मशानाची साफ सफाई करुन या ठिकाणी जेवण बनवण्यात आले. स्मशानभूमीत असलेल्या झाडांच्या सावलीत या मजुरांनी आश्रय घेऊन जेवण केले.