महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पर्यावरणपूरक होळीसाठी अंनिसचे विविध शाळांमध्ये प्रबोधनपर कार्यक्रम - Holi

नागरिकांनी पर्यावरणपूरक होळी आणि रंगपंचमी साजरी करावी, यासाठी अंनिसच्या पदाधिकाऱ्याकडून ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये प्रबोधन  करण्यात येत आहे.b

पर्यावरणपूरक होळीसाठी अंनिसचे विविध शाळांमध्ये प्रबोधनपर कार्यक्रम

By

Published : Mar 19, 2019, 9:34 PM IST


ठाणे- नागरिकांनी पर्यावरणपूरक होळी आणि रंगपंचमी साजरी करावी, यासाठी अंनिसच्या पदाधिकाऱ्याकडून ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये प्रबोधन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा प्रधान सचिव प्राध्यापक गणेश शेलार यांनी कोनगांव, आठगाव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, जि.प. शाळा सरवली, सोनाळे, गोवे या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.

'होळी करा लहान, पोळी करा दान' या अंनिसच्या उपक्रमाची माहिती शेलार यांनी विद्यार्थ्यांना दिली. पोळी होळीत टाकण्याऐवजी त्या गरिबांना दिल्या तर त्यांचाही सण गोड होईल, असा उपक्रम मागील ३ वर्षांपासून विविध शाळांमध्ये राबवला जात आहे. महिला ज्या पोळ्या दान करतात त्या जमा झालेल्या पोळ्या अंनिस कार्यकर्ते विटभट्टीवर काम करणारे मजूर, फूट पाथवर राहणाऱ्या निराधार लोकांना व भिक्षुकांना देतात. तसेच यावेळी पर्यावरणपूरक रंगपंचमी कशी साजरी करावी, याबाबतही माहिती दिली.

पर्यावरणपूरक होळीसाठी अंनिसचे विविध शाळांमध्ये प्रबोधनपर कार्यक्रम

रासायनिक रंग त्वचा, डोळे यासाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे नैसर्गिक रंगाचा वापर करावा, असे आवाहन यावेळी शेलार यांनी केले. नैसर्गिक जल रंग व कोरडे रंग कसे बनवायचे त्याचीदेखील माहिती यावेळी देण्यात आली. हळद व मैदयापासून पिवळा रंग, बिट या फळापासून लाल रंग, पालक किंवा कडुलींबाच्या पानांपासून हिरवा रंग बनवता येतो. तसेच पळस, झेंडूची फुले, जास्वंद या फुलांपासूनही नैसर्गिक रंग कसे बनवायचे याबद्दल शेलार यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी शाळेतील शिक्षक नम्रता पातकर, विलास गायक, राजेश कराळे, निलिमा पाटील, पुष्पावती भोईर, आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details