ठाणे - आनंद परांजपे यांना संसदेत काम करताना आम्ही पाहिले आहे. ते उच्चशिक्षित आहेत, शिवाय सुसंस्कारीही आहेत. शिक्षणातूनच प्रगल्भता आणि समानता आणता येते. त्यामुळे या दोन्ही गुणांचा मेळ साधला जात असेल तर तो बोनसच आहे. हा बोनस आनंद परांजपे यांच्या रुपाने ठाणेकरांना मिळणार आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले. त्या ठाण्यातील आघाडीच्या सभेत बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आदर्श खासदार कसा असावा, हे आनंद परांजपे यांना संसदेत पाहताना आम्हाला उमगले. संसदेमध्ये सुशिक्षित खासदार असावेत. त्यासाठी ठाणेकरांनी आनंद परांजपे यांना संधी दिली पाहिजे. यावेळी आनंद परांजपे यांनी केवळ प्रचारात आघाडी घेतली आहे, असे नाही. तर त्यांनाच यावेळी विजयाची संधी आहे. आता राज्यात आणि देशात परिस्थिती बदलली आहे.
देशात परिवर्तनाची गरज आहे, हे सामान्य लोकच सांगत आहेत. या मेळाव्यात उपस्थित असलेल्या अनेक महिलांनी रेशनिंगसह अनेक समस्या आम्हाला सांगितल्या. आघाडी सरकारच्या काळात या समस्या जाणवतही नव्हत्या. त्या समस्या आता लोकांना सहन कराव्या लागत आहेत. या सर्व समस्यांचा निपटारा आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर करण्यात येणार आहे, असे सुळे म्हणाल्या.
ठाणे शहराशी संबधित प्रश्नांवर बोलताना त्या म्हणाल्या, की ठाणे शहराला स्मार्ट करण्यात येणार होते. मात्र, स्मार्ट सिटीचा हा प्रकल्पच फसला आहे. या सरकारने आणलेल्या स्मार्ट सिटी, स्टँड अप, मेक इन इंडिया अशा अनेक योजना फेल गेल्या आहेत. सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. म्हणूनच महाआघाडीने या जनविरोधी सरकारला सत्तेवर पायउतार करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये आपल्याला यश मिळणारच आहे. मराठी शाळा बंद होत आहेत, याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर एकही मराठी शाळा बंद होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी(कवाडे), रिपाइं (गवई), रिपाइं (एकतावादी) महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ ठाण्यातील टीपटॉप प्लाझा येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास खा. सुप्रिया सुळे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. या प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विद्या चव्हाण, ठाणे अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस सुजाता घाग, काँग्रेसच्या ठाणे महिलाध्यक्षा शिल्पा सोनोने आदी उपस्थित होते.