ठाणे- भारतीय सैन्यासाठी शस्त्र आणि दारूगोळा तयार करणाऱ्या अंबरनाथच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील कर्मचाऱ्यांनी व्हेंटिलेटर्सची निर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या लढाईतही ऑर्डिनन्सचे कर्मचारी अग्रेसर झाल्याचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी महिनाभरात २ हजार व्हेंटिलेटर्सची निर्मिती करणार असल्याचे सांगण्यात आले.
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी ऑर्डिनन्स फॅक्टरीचे कर्मचारी सरसावले; व्हेंटिलेटर्सची करणार निर्मिती
अंबरनाथच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीत सैन्यासाठी शस्त्रे बनवणाऱ्या कामगारांकडून व्हेंटिलेटर्सची निर्मिती सुरु झाली आहे. महिनाभरात 2 हजार व्हेंटिलेटर्स तयार करणार असल्याचे जनरल मॅनेजर राजीव कुमार यांनी सांगितले.
अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांनी अतिशय कमी खर्चात हे व्हेंटिलेटर्स तयार केले आहेत. हे व्हेंटिलेटर्स पोर्टेबल असून वीजेसोबतच बॅटरीवरही ते तीन तास चालू शकतात. त्यामुळे रुग्णवाहिकेतही ते अतिशय उपयोगी ठरतील. कोरोनाच्या रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने या व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यात आली असून मिनिटाला किमान १२ आणि कमाल ३० वेळा ते श्वासोच्छ्वास पुरवू शकतात.
सरकारला गरज पडल्यास महिनाभरात असे २ हजार व्हेंटिलेटर्स युद्धपातळीवर तयार करण्याची क्षमता ऑर्डिनन्स फॅक्टरीकडे आहे. १९५३ साली सुरू झालेल्या अंबरनाथच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीत सध्या बॉम्बशेल्स, मिसाईल फ्यूज कंडक्टर्स, बंदुका अशा अनेक शस्त्रांची निर्मिती भारतीय सैन्यासाठी केली जाते. आता व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीमुळे शत्रूशी लढणारे ऑर्डिनन्स फॅक्टरीचे कर्मचारी कोरोनाच्या युद्धातही अग्रेसर असल्याचं पाहायला मिळत आहे.