महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषिमंत्र्यांसह २ मंत्र्यांची कृषी महोत्सवाकडे पाठ; राज्यमंत्र्यांच्या हस्ते उरकले उद्घाटन - सदाभाऊ खोत

गुरुवारपासून सुरू झालेल्या कृषी महोत्सवाची तयारी गेल्या महिन्यापासून सुरू होती. त्यामध्ये कृषिमंत्री सदाभाऊ खोत, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना या महोत्सवाचे निमंत्रण देवून त्यांच्या वेळा निश्चित केल्याचे सांगण्यात आले. मात्र, ऐनवेळी हे तिन्ही मंत्री याठिकाणी आलेच नाही.

कृषी महोत्सव

By

Published : Feb 8, 2019, 3:28 PM IST

ठाणे - युती सरकारचे मंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी मंत्रालयातील बैठकांना 'आम्हीच शेतकऱ्यांचे तारणहार' असल्याच्या तोऱ्यात बोलताना दिसतात. दरम्यान, गुरूवारी ठाणे जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी कृषिमत्र्यांसह २ मंत्र्यांना प्रमुख पाहणे म्हणून निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, या तिन्ही मंत्र्यांनी कृषी महोत्सवाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीत जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन उरकून घेण्याची वेळ कृषी अधिकाऱ्यांवर आली.

गुरुवारपासून सुरू झालेल्या कृषी महोत्सवाची तयारी गेल्या महिन्यापासून सुरू होती. त्यामध्ये कृषिमंत्री सदाभाऊ खोत, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना या महोत्सवाचे निमंत्रण देवून त्यांच्या वेळा निश्चित केल्याचे सांगण्यात आले. मात्र, ऐनवेळी हे तिन्ही मंत्री याठिकाणी आलेच नाही. त्यातच कृषी विभागाकडून या महोत्सवात सत्कार करण्यात येणारे शेतकरी सकाळी ११ वाजल्यापासून कार्यक्रमाच्या ठिकाणी येवून बसले होते. या शेतकऱ्यांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याने काही शेतकरी कुटुंबासह आले होते. दुपारी १ वाजता होणारे उद्घाटन तब्बल दीड तासांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.

मंत्र्याला आमच्यासाठी वेळ नाही. आम्हाला वाटले, की मंत्री आमचा सत्कार करतील, मात्र हेही तसेच निघाल्याचे सांगत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

भाजपने भाताला भाव दिला - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

भाजपचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या भाताला १,७५० रुपयांपेक्षा अधिक दर दिला. तसेच शेतकऱ्यांशी संबंधित योजनांचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रयोग सुरू असून शेतकऱ्यांनी या संशोधनाचा फायदा करून घ्यावा. वांगणीमध्ये फुलणाऱ्या गुलाबाची विदेशात निर्यात होते. त्याप्रमाणे जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांनी फुलशेती व भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर करावी, असे आवाहनही त्यांनी केले. बदलापूर परिसरात मोगऱ्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते, परंतु शेतकरी बाजारपेठेत वेळेवर पोहचू शकत नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव, कल्याण डोंबिवली महापौर विनिता राणे, कृषी सभापती उज्वला गुळवी, महिला बालकल्याण सभापती दर्शना ठाकरे, जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने, आत्माचे प्रकल्प संचालक पी. एम. चांदवडे हे उपस्थित होते.

शेतकऱ्याचा सन्मान

येत्या १४ फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात कृषी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱयांचा रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याशिवाय आत्मा अंतर्गत गट राजमाता शेतकरी स्वयंसहायता गट, कृषिभूषण शेतकरी स्वयंसहायता गट, समर्थ सेंद्रिय भाजीपाला उत्पादक गट, सप्तशृंगी शेतकरी गट यांचादेखील सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे कल्याण, शहापूर, मुरबाडच्या १३ शेतकऱ्यांना गौरवण्यात आले.

या कृषी प्रदर्शनात ३० दालने शासनाच्या विभागांची असतील, तर २५ कृषी निविष्टा, ५ दालने कृषी तंत्रज्ञान, ३० दालने गृहोपयोगी वस्तू, ५ दालने कृषी यंत्रसामुग्री व अवजारे, त्याचप्रमाणे ५५ दालने ही धान्ये, खाद्यपदार्थे यांची असतील. या कृषी महोत्सवात विविध परिसंवाद, चर्चा सत्रे, प्रदर्शने यांचे आयोजन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details